तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 06:44 IST2025-10-11T06:44:11+5:302025-10-11T06:44:31+5:30
हार्बर मार्गावर ब्लाक काळात कुर्ला ते वाशीदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे

तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य रेल्वेकडून मुख्य मार्गावर कर्जत स्टेशन व यार्डच्या रीमॉडेलिंगसाठी कर्जत ते खोपोलीदरम्यान शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२:२० ते रविवारी सायंकाळी ६:२० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, हार्बर मार्गावर रविवार, १२ ऑक्टोबरला कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
हार्बर मार्गावर ब्लाक काळात कुर्ला ते वाशीदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. तसेच, ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.
पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लाॅक
बोरीवली ते राममंदिर स्थानकांदरम्यान रविवारी अप जलद मार्गावर आणि राममंदिर ते कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर दुरुस्ती करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान अप जलद मार्गावरील सर्व लोकल बोरीवली ते अंधेरीदरम्यान अप धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच पाचव्या मार्गावरील गाड्या अंधेरी ते बोरीवलीदरम्यान डाउन जलद मार्गावरून धावणार आहेत. तसेच काही बोरीवली लोकल हार्बर मार्गावरून गोरेगाव स्थानकांपर्यंत चालविण्यात येणार आहेत.
एक्स्प्रेसमधून पडून तरुणाचा मृत्यू
कल्याण : धावत्या एक्स्प्रेसमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आंबिवली-शहाडदरम्यान गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. शादाब खान (३२) असे मृताचे नाव असून, तो मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
नागपाडा येथे हॉटेलात काम करणारा कामगार शादाबने गुरुवारी रात्री कुशीनगर एक्स्प्रेस पकडली होती. दरम्यान गुरुवारी रात्री आंबिवलीनजीक आबिद जाफर शेख हा आणखी एक प्रवासी गाडीतून पडून जखमी झाला. पण आबिद कोणत्या गाडीतून प्रवास करीत होता, याचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.