Join us

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 19:06 IST

मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेऊन दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेतली आहेत. 

मुंबई : अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य रेल्वे मार्गावर लोकल सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घेऊन दुरुस्ती आणि देखभालीची कामे हाती घेतली आहेत. मध्य रेल्वेने ९६ दिवसांनी मोठा मेगाब्लॉक घेतला आहे. याआधी मागील रविवारी आंबिवली येथे पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी मेगाब्लॉक घेतला होता. मध्य रेल्वेच्या दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर विद्याविहार - मुलुंड दरम्यान रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही दिशेकडे सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ ब्लॉक असणार आहे. 

सकाळी १०.१६ ते दुपारी २.१७ या दरम्यान सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या जलद विशेष लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यानंतर या लोकल मुलुंड येथून जलद मार्गावर वळविण्यात येतील. दुपारी १२.४१ ते दुपारी ३.२५ या वेळेत ठाणे येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद विशेष लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान धिम्या मार्गावर कळविण्यात येतील. माटुंगा येथून जलद मार्गावर लोकल सेवा वळविण्यात येतील. या मेगाब्लॉकमुळे काही ठाणे व कल्याण लोकल रद्द केल्या जातील. मात्र राज्य शासनाने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी पुरेशा सेवा चालविण्यात येतील. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गवरील पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमध्ये नेरूळ / बेलापूर-खारकोपर हार्बर मार्गाचा समावेश आहे. सकाळी ९.४५ ते दुपारी ३.०० पर्यंत हार्बर मार्गावरून सीएसएमटीहून पनवेल दिशेकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द केल्या आहेत. पनवेलहून सीएसएमटी जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.१५ ते दुपारी ४.००  वाजेपर्यंत रद्द केल्या आहेत. या ब्लॉक कालावधीत विशेष लोकल सीएसएमटी- मानखुर्द- सीएसएमटी  या विभागात धावतील. 

१४ व्या रविवारी मोठा मेगाब्लॉक मुंबईची उपनगरीय लोकल सेवा गेली अडीच महिन्यापासून  बंद होती.  त्यामुळे उपनगरीय रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नव्हता. मध्य रेल्वेने शेवटचा मेगाब्लॉक २२ मार्च २०२० ला घेतला होता. त्यानंतर उपनगरीय रेल्वे मार्गवर १३ व्या रविवारी आंबिवली येथे पादचारी पुलाचे पाडकाम करण्यासाठी दुपारी मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र लोकलच्या वेळापत्रकात बदल झाला नव्हता. आता १४ व्या रविवारी पहिला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. कारण राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी १५ जूनपासून मध्य रेल्वे मार्गावर दिवसाला २०० फेर्‍या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची नियमित दुरुस्ती करण्यासाठी आता मोठा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने घेतला आहे.

टॅग्स :रेल्वेमुंबईकोरोना वायरस बातम्या