Join us  

भाजपमध्ये आज पुन्हा होणार मेगाभरती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:17 AM

भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरतीचा मोसम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे.

मुंबई : भाजपमध्ये पुन्हा एकदा मेगाभरतीचा मोसम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईतील गरवारे क्लब येथे सोमवारी प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. त्यात काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाच्या चर्चेमुळे काँग्रेसच्या काही आमदारांचा पक्ष प्रवेश रखडला होता. एकीकडे रखडलेला भाजप प्रवेश आणि दुसरीकडे काँग्रेसनेही या आमदारांना अंतरावर ठेवण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे या आमदारांचे काय होणार अशी चर्चा होती. अखेर भाजपने मेगाभरतीचा मुहुर्त निश्चित केल्याने या आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. विशेष म्हणजे काँग्रेसने रविवारी आपली पहिली यादी जाहिर केली. त्यात काही विद्यमान आमदारांची नावे वगळण्यात आली. हे आमदार सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या आमदारांनीसुद्धा काँग्रेसच्या कार्यक्रमातून अंग काढले होते.अखेर आज राज ठाकरे बोलणारविधानसभा निवडणुकीतील भूमिकेबद्दलचा संभ्रम, सक्तवसुली संचालनालयाकडून झालेली चौकशी या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी आणि काय बोलणार, याची उत्सुकता काही दिवसांपासून होती. अखेर सोमवारी राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून यात राज पुढील वाटचालीबाबत घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.वांद्रे येथील या बैठकीस विधानसभा निवडणुकीसाठीचे सर्व इच्छुक उमेदवार, नेते, सरचिटणीस, राज्य सचिव, उपाध्यक्ष आणि मुंबईतील विभाग अध्यक्षांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी अन्य पक्षातील काही मंडळींचा मनसेत प्रवेशही असणार आहे. दरम्यान, मनसे १२५ जागांवर निवडणूक लढविणार असल्याची माहिती सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. आघाडी आणि युती एकत्रितपणे निवडणुकीस सामोरे जाणार असल्याने त्या चारही पक्षात बंडखोरीची शक्यताही देशपांडे यांनी वर्तविली. मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये विशेष लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019भाजपा