मुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 12:47 IST2018-08-04T02:10:00+5:302018-08-04T12:47:25+5:30
मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.

मुंबईतील मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
मुंबई : मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४. १५पर्यंत ब्लॉक असेल. मेल-एक्स्प्रेससह जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. हार्बरवर पनवेल ते वाशीदरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी ११.३० ते दुपारी ४.३०पर्यंत सीएसएमटी-पनवेल/ बेलापूर/ वाशी-सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल धावणार नाही. ट्रान्सहार्बर सकाळी १०.१२ ते दुपारी ४.२६ पर्यंत बंद असेल. ठाणे-वाशी/नेरूळ तसेच सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.
आज रात्रकालीन ब्लॉक
कुर्ला ते विद्याविहारदरम्यान पादचारी पूल गर्डर उभारणीसाठी शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असेल. अप धिम्या मार्गावर रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ४.५० तसेच डाऊन जलद मार्गावर रात्री ११.४० ते पहाटे ४.५० आणि अप जलद मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ३.३०पर्यंत काम करण्यात येणार आहेत.
जम्बोब्लॉक : पश्चिम रेल्वेमार्गावरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान ब्लॉक काळात अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.