Join us  

RSS, भाजप श्रेष्ठींसोबत फडणवीस, बावनकुळेंच्या बैठका; सलग दोन दिवस सात तास खलबते 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 9:12 AM

या बैठकांनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे दोन वरिष्ठ राष्ट्रीय पदाधिकारी व रा. स्व. संघाचे पदाधिकारी यांच्यात मुंबईमध्ये सलग दोन दिवस तब्बल सात तास बैठका झाल्या. या बैठकांनंतर फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. 

संघाचे येथील मुख्य कार्यालय असलेल्या यशवंत भवनात मंगळवारी रात्री चार तास आणि बुधवारी सकाळी तीन तास या बैठकी झाल्या. भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष आणि राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, तसेच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या बैठकांमध्ये फडणवीस आणि बावनकुळे यांच्याशी दीर्घ चर्चा केली. 

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप व संघ, तसेच संघ परिवारातील संघटनांमध्ये कसा समन्वय राखायचा, या दृष्टीने एक आराखडा या बैठकीत चर्चिला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार आणि राज्यातील पक्षसंघटनेची कामगिरी याचा आढावा यावेळी घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीला सात महिने शिल्लक असताना सरकारने अधिक लोकाभिमुख निर्णय घ्यावेत, तीन पक्षांच्या युतीने राजकीय विश्वासार्हता निर्माण करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याने भाजपमध्ये आलेली अस्वस्थता, कार्यकर्त्यांच्या प्रश्नाची उत्तरे देण्याची मागणी होत आहे.

रावल, सागर यांना जबाबदारी

मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. माजी मंत्री आ. जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात राज्यातील भाजपचे २५ आमदार १९ ऑगस्टपासून सात दिवस मध्य प्रदेशात जाणार आहेत. मुंबईतील आ. योगेश सागर यांच्या नेतृत्वात १५ आमदार तेलंगणामध्ये जाणार आहेत. तिथे त्यांना काही मतदारसंघांची जबाबदारी दिली.

बावनकुळे २७ जिल्ह्यांच्या दौऱ्यावर 

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपकडील लोकसभा मतदारसंघांमध्येही परिक्रमा यात्रा काढण्याचे ठरविलेले असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २० ऑगस्टपासून २७ लोकसभा मतदारसंघांमध्ये दौरे करणार आहेत. त्यात राष्ट्रवादी  आणि शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघांचाही समावेश आहे.

या नियमित स्वरूपाच्या बैठका होत्या. दर तीन महिन्यांनी भाजप-संघ समन्वयाची बैठक होतच असते. संघटनात्मक विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली. कोणताही राजकीय विषय नव्हता. - चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसचंद्रशेखर बावनकुळेचंद्रशेखर बावनकुळेराष्ट्रीय स्वयंसेवक संघभाजपाराजकारण