Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागण्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 18:15 IST

A meeting will be held soon : येत्या आठवड्याभरात हे प्रश्न सोडविण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी कोळी बांधवांचा जातीचा दाखला वैधता, नोकरीतील संरक्षण आणि मासेमारी व्यवसायातील विविध मागण्यांसाठी  विधानसभेवर आयोजित  लॉंगमार्चचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व करून कोळी समाजाच्या मागण्यांना जाहिर पाठिंबा दिला. कोळी समाजाचे सर्व प्रश्न मी स्वतः सभागृहात मांडून सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

कोळी महासंघाचे अध्यक्ष व विधान परिषदेचे भाजप आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली  विधानसभेवर नुकत्याच निघालेल्या भव्य इशारा मोर्चातील शिष्टमंडळा सोबत  फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी येत्या आठवड्याभरात हे प्रश्न सोडविण्याचे जाहीर निर्देश संबंधित खात्यांना दिले. लोकमतने सातत्याने कोळी समाजाच्या समस्या मांडल्या आहेत.

मुंबईतील फॅशन स्ट्रीट वरून निघालेला कोळी बांधवांचा लॉंग मार्च बॉम्बे जिमखान्याला वळसा घेऊन आजाद मैदान येथे आला तेथे जाहीर सभेमध्ये याचे रूपांतर झाले. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाच्या विविध मागणीकरिता आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा इशारा मोर्चा काढण्यात आला होता.

आदिवासी कोळी बांधवांच्या अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्रा बाबत तत्कालीन शासनाने गठीत केलेल्या  माजी न्यायाधीश पी. व्ही हरदास यांच्या समितीचा अहवाल शासनाने मान्य करून तो लागू करावा, सेवा निवृत्त आदिवासी कर्मचाऱ्यांचे रोखून ठेवलेला निवृत्ती वेतन निधी तात्काळ द्यावा,  अदिसंख्य पदांवर नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे,नैसर्गिक आपत्तीग्रस्त आणि दुष्काळग्रस्त मासेमारांना  घोषित केलेली तुटपुंजी मदत वाढवून तात्काळ वितरित करावी,  मुंबईतील सर्व कोळीवाड्यांना विस्तारासाठी मोकळी जमिन देऊन त्यांचे सीमांकन करावे,  आणि वाशी - मानखुर्द नवीन पुलामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्या घेऊन कोळी महासंघाने इशारा मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये कोळी महासंघाच्या प्रमुख मागण्यांचा लॉंग मार्च काढण्यात आला.महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांसह दहा हजाराहून अधिक कोळी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले.

​  जोपर्यंत कोळी समाज बांधवांचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी संघर्ष करत राहणार , कोळी समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारकडे मांडत राहणार असे प्रतिपादन आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.

मोर्चात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजपा मुंबई अध्यक्ष,आमदार मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार अँड.अशिष शेलार, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार प्रसाद लाड,आमदार राजेंद्र पठाणी या सर्वांनी उपस्थित राहून मोर्चाला पाठिंबा दिला.

यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, उपनेते देवानंद भोईर, राजश्री भानजी, नगरसेवक रजनी केणी,  युवाअध्यक्ष अँड चेतन पाटील, रामभाऊ कोळी , सुनिता माहुलकर, अरुण लोणारे, सुरेश पाटकर, अभय पाटील, डी. एम. कोळी आदी महाराष्ट्रातील कोळी  सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र