चर्चा तर होणारच... थोरात, अनिल परब अन् फडणवीस यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 11:37 IST2021-11-19T05:37:03+5:302021-11-19T11:37:33+5:30
विधान परिषद निवडणुकीबाबत चर्चा

चर्चा तर होणारच... थोरात, अनिल परब अन् फडणवीस यांची भेट
मुंबई : महसूल मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात संसदीय कार्यमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी गुरुवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट झाली. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
काँग्रेसने दिवंगत खा. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आपण फडणवीस यांची भेट घेतल्याचे बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील भेटीसाठी येणार होते. मात्र, त्यांच्या पक्षाची त्याचवेळी बैठक सुरू झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. एखाद्या दिवंगत नेत्याच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेवर उर्वरित कालावधीसाठी जेव्हा निवडणूक होते तेव्हा ती बिनविरोध व्हावी, यासाठी सगळेच प्रयत्न करतात. महाराष्ट्राची ती परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचेही थोरात म्हणाले. यावेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयीदेखील बोलणे झाल्याचे परिवहनमंत्री परब यांनी पत्रकारांना सांगितले. फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रा.पं. पोटनिवडणूक २१ डिसेंबरला
मुंबई : राज्यातील ४५५४ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या ७१३० सदस्यपदांसाठी येत्या २१ डिसेंबर पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
मदान यांनी सांगितले, ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. छाननी ७ डिसेंबरला होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ रोजी दुपारी ३ पर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. मतदान २१ डिसेंबरला होईल. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असेल. २२ डिसेंबरला मतमोजणी होईल.