Join us  

एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची आज बैठक; मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 4:16 PM

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी बैठक होणार आहे.

मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी बैठक होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले आहे. सदर बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं कायम राहणार असून गृहमंत्री, महसूल आणि अर्थ हे खातं भाजपा घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रीपद दिले असल्याने एक-दोन खाती कमी घेण्याचा आग्रह धरला जाऊ शकतो.  दोघे ५०-५० टक्के मंत्रिपदे वाटून घेतील, अशी चर्चा होती. मात्र, भाजपचा वाटा अधिक असेल. जातीय, विभागीय संतुलन साधताना केवळ हे दोनच निकष न वापरता मंत्री म्हणून काम करण्याचा आवाका किती हे तपासून संधी दिली जाणार आहे. कमी कालावधीत अधिक दमदार कामगिरी मंत्र्यांना दाखवावी लागणार आहे.

दरम्यान, राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात असून, अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १२ किंवा १३ जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपा