Join us  

दिल्ली घडामोडीनंतर भेट, महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत स्पष्टच बोलले पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 8:12 PM

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे

ठळक मुद्देखासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे

नवी दिल्ली - निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गेल्या 10 दिवसांत तीनवेळा बैठक झाली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी काल विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर आज प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांना भेटले आहेत. त्यामुळे, देशासह राज्यातही राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच, मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय रद्द केल्याने महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. ''मी शरद पवार यांना भेटलो. दिल्ली-महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थीरतेसंदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करतील, ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत,'' असे पवारांनी म्हटल्याचे, राऊत यांनी सांगतिलं. 

त्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खुद्द शरद पवारांच्या हस्ते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्याचा कार्यक्रम घेतला होता. शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. मात्र आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शरद पवारांनाही हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

राष्ट्रपती पदाची उमेदवारी हा विषय नाही

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट, त्यानंतर पवारांच्या घरी पार पडलेली विरोधकांची बैठक यानंतर तिसऱ्या आघाडीचा विषय चर्चेत आला. काँग्रेस, भाजपेतर पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न पवारांकडून सुरू आहे का, अशी चर्चादेखील सुरू झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे पवार राष्ट्रपती पदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत का, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. त्यावर आम्हाला संख्याबळाची कल्पना आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठीची उमेदवारी हा काही विषय नाही, असं शरद पवारांनी सांगितल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. 

टॅग्स :संजय राऊतशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना