मुंबई : रेल्वे प्रवाशांना तातडीने वैद्यकीय मदत व उपचार मिळावेत, यासाठी मध्य रेल्वेने मुंबई विभागातील १८ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या १० स्थानकांसाठी ई-लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित आठ स्थानकांसाठी लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांना दिली.
रेल्वे स्थानकांवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी झवेरी यांनी काही वर्षांपूर्वी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येक उपनगरी स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.
सद्य:स्थितीत मध्य आणि हार्बर मार्गावरील ९० पैकी फक्त चार स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे झवेरी यांनी १९ जून २०२५ आणि २९ ऑगस्ट २०२५ रोजी रेल्वेमंत्री आणि महाव्यवस्थापकांना पत्रे पाठवून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची विनंती केली. त्यानुसार मध्य रेल्वेने अंमलबजावणी सुरू केल्याचे झवेरी यांनी सांगितले.
प्रशिक्षित कर्मचारी, ऑक्सिजन
प्रत्येक वैद्यकीय कक्षात मूलभूत जीवन समर्थन प्रणाली, ऑक्सिजन, स्ट्रेचर तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असतील.
त्यामुळे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका, अपघात किंवा अन्य गंभीर आरोग्य समस्यांच्या वेळी प्रवाशांना त्वरित उपचार मिळणे शक्य होणार आहे.
...या ठिकाणी मिळणार सुविधा
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या कळवा, टिटवाळा, कर्जत, कुर्ला, ठाणे, मुंब्रा, घाटकोपर, चेंबूर, मानखुर्द आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकांसाठी लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, दादर, सायन, विक्रोळी, भांडुप, दिवा, डोंबिवली, कसारा, इगतपुरी स्थानकांसाठी ई-लिलाव लवकरच होणार आहेत.
हृदयविकारावेळी वाचणार जीव
मुंबईत लोकल ट्रेनने रोज सुमारे ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रवाशांची सुरक्षितता आणि कल्याणासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील.
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गर्दीच्या वेळी होणाऱ्या दुखापती, हृदयविकाराचा झटका किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Web Summary : Central Railway will establish emergency medical rooms at 18 Mumbai stations. E-auctions are complete for 10 locations. This initiative follows a court order to provide medical facilities, including trained staff and oxygen, for passenger emergencies like heart attacks.
Web Summary : मध्य रेलवे मुंबई के 18 स्टेशनों पर आपातकालीन चिकित्सा कक्ष स्थापित करेगा। 10 स्थानों के लिए ई-नीलामी पूरी हो चुकी है। यह पहल हृदयघात जैसी यात्री आपात स्थितियों के लिए प्रशिक्षित कर्मचारियों और ऑक्सीजन सहित चिकित्सा सुविधाएं प्रदान करने के लिए एक अदालत के आदेश का पालन करती है।