Mumbai Sessions Court:मुंबईच्या सत्र न्यायालयात मंगळवारी एका आरोपीने चक्क पोलिसावर हल्ला करून पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॅरिसन अँथनी जोसेफ (४२) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मकोकासारख्या गंभीर गुन्ह्याखाली कारवाई सुरू होती. भरदिवसा आणि कडक पोलीस बंदोबस्तात घडलेल्या या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी दुपारी हॅरिसन जोसेफ याला सुनावणीसाठी आर्थर रोड कारागृहातून सत्र न्यायालयात आणण्यात आले होते. कोर्ट रूम क्रमांक १० मधील सुनावणी संपल्यानंतर, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत श्रीमंत कांबळे हे त्याला पुन्हा लॉकअपकडे घेऊन जात होते. तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्याकडे उतरत असताना, हॅरिसनने अचानक कॉन्स्टेबल कांबळे यांच्या हातावर जोरदार प्रहार केला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे पोलिसाची पकड सैल झाली आणि याचाच फायदा घेत हॅरिसनने हातातील बेड्यांसह न्यायालयाच्या आवारातून पळ काढला.
कोण आहे हॅरिसन जोसेफ?
हॅरिसन जोसेफ हा क्रॉफर्ड मार्केटजवळील मुसाफिरखाना परिसरातील रहिवासी असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मार्च २०२४ मध्ये किरकोळ वादातून त्याने आपल्या दोन साथीदारांसह एका बॅग विक्रेत्यावर एअर गनमधून गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मकोकाची कारवाई
त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली होती. तो जानेवारी २०२५ पासून न्यायालयीन कोठडीत होता.
पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र
आरोपी पसार झाल्याचे लक्षात येताच सत्र न्यायालयात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. तातडीने न्यायालयाचे सर्व दरवाजे बंद करून शोध घेण्यात आला, मात्र तो सापडला नाही. याप्रकरणी आता कुलाबा पोलीस ठाण्यात हॅरिसन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे अशा संवेदनशील ठिकाणाहून आरोपी पसार होणे ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक कुलाबा पोलिसांसोबतच मुंबई गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली आहेत.
Web Summary : A MCOCA accused, Harrison Joseph, escaped from Mumbai Sessions Court after attacking a police constable. He fled with handcuffs during a hearing. Police have launched a manhunt.
Web Summary : मुंबई सत्र न्यायालय में मकोका का आरोपी हैरिसन जोसेफ पुलिस पर हमला कर फरार हो गया। सुनवाई के दौरान हथकड़ी सहित भागा। पुलिस ने तलाशी अभियान शुरू किया।