Join us

एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 05:50 IST

MCA elections:

- रोहित नाईकमुंबई - भारतीय क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आ. जितेंद्र आव्हाड यांनी तब्बल १३६ मतांनी बाजी मारली. या निवडणुकीत शरद पवार-आशिष शेलार गटाने १६ पैकी १२ जागांवर विजय मिळवून आपला दबदबा राखला.

बुधवारी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या निवडणुकीत ३७२ पैकी ३६५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. उपाध्यक्षपदासाठी आव्हाड यांनी नविन शेट्टी यांचा २०१-१५५ असा मोठ्या फरकाने पराभव केला. डाॅ. उन्मेश खानविलकर हेदेखील सचिवपदी निवडून आले. त्यांनी शाहआलम शेख यांचा २२७-१२९ असा एकतर्फी पराभव केला. प्रदीर्घ अनुभवाच्या जोराव नीलेश भोसले यांनी संयुक्त सचिवपद मिळवताना गौरव पय्याडे यांचे आव्हान २२८-१२८ अशा फरकाने परतवले. अरमान मलिक यांनी खजिनदारपद कायम राखतानासुरेंद्र शेवाळे यांना २३४-११९ असे परतावले.नॅशनल क्रिकेट क्लबचे प्रमुख राजदीप गुप्ता यांची टी-२० मुंबई गव्हर्निंग कौन्सिल यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड तर, कौन्सिलच्या सदस्यपदासाठी रंगलेल्या लढतीत भरत किणी यांनी १८४-१३२ अशा विजयासह किशोर जैन यांना धक्का दिला.

हा विजय मैदान क्लब्स, सर्व महिला-पुरूष क्रिकेटपटू यांच्या मेहनतीचा विजय आहे. मुंबई क्रिकेटला बीसीसीआयकडून सर्वोत्तम राज्य संघटनेचा पुरस्कार मिळाला आहे. हीच कामगिरी कायम राखण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.- अजिंक्य नाईक, अध्यक्ष - एमसीए 

निवडणूक राजकीय असो की क्रिकेटची, माझ्यासाठी प्रत्येक निवडणूक एकसमान असते. आतापर्यंत मुंबई क्रिकेटसाठी खूप काम केले आणि हेच काम यापुढेही कायम ठेवेन. मुंबई क्रिकेटला आणखी उंची गाठून देण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह पूर्ण प्रयत्न करेन.- जितेंद्र आव्हाड, उपाध्यक्ष - एमसीए 

ॲपेक्स कौन्सिलसाठी रंगली चुरस 'एमसीए' ॲपेक्स कौन्सिलच्या ९ जागांसाठी एकूण २० उमेदवारांनी निवडणुक लढवली. यामध्ये संदीप विचारे यांनी सर्वाधिक २४७ मतांसह बाजी मारत आघाडी राखली. यानंतर सुरज समत (२४६), विघ्नेश कदम (२४२), मिलिंद नार्वेकर (२४१), भूषण पाटील (२०८), नदीम मेमन (१९८), विकास रेपाळे (१९५), प्रमोद यादव (१८६), नील सावंत (१७८) यांनी ९ सदस्यीय ॲपेक्स कौन्सिलमध्ये जागा मिळवली. 

मतदान करण्याचा माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना दिला पहिला मान एमसीएच्या निवडणुकीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या मुंबईच्या माजी क्रिकेटपटूंनीही मतदान केले. यावेळी, दिग्गज सुनील गावसकर यांनी पहिले मतदान करण्याचा मान केला. याशिवाय सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजित आगरकर, दिलीप वेंगसरकर, धवल कुलकर्णी, ॲबी कुरविल्ला, नीलेश कुलकर्णी, चंद्रकांत पंडीत, रमेश पोवार, प्रवीण आमरे, वसिम जाफर, सुरू नायक, संजय बांगर या माजी क्रिकेटपटूंसह दिग्गज हाॅकीपटू धनराज पिल्ले आणि रोहित शर्मा-शार्दूल ठाकूर यांचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

या कारणामुळे नाईक यांचा मार्ग मोकळा 'एमसीए' निवडणूक बिनविरोध होत असल्याने  सध्या स्थगितीची गरज नसल्याचे स्पष्ट करत, मुंबई उच्च न्यायालयाने ५ डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब केली आहे. यामुळे अजिंक्य नाईक यांचा 'एमसीए' अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, या निवडणुकीचा निकाला उच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशावर अवलंबून असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.नाईक यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीविरूद्ध  उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, त्यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाल्याने यावर तातडीने निर्णय देण्याची गरज नसल्याचे उच्च न्यायालाने स्पष्ट केले. याचिकेवर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नाईक आणि 'एमसीए' निवडणुक समितीला दिले आहेत. 'एमसीए'चे सदस्य समीर पेठे यांनी ही याचिका दाखल केली होती. नाईक यांनी 'एमसीए'च्या ॲपेक्स कौन्सिलमध्ये सलग दोन कालावधी पूर्ण केला असल्याने त्यांना कुलिंग ऑफ कालावधी (सक्तीची रजा) घेणे अनिवार्य असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी पेठे यांनी याचिकेद्वारे केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Awhad wins MCA vice-presidency; Naik elected unopposed as president.

Web Summary : Jitendra Awhad won MCA vice-presidency by 136 votes. Ajinkya Naik was elected president unopposed. Pawar-Shelar group secured 12 of 16 seats. Veteran cricketers voted; court adjourned hearing on Naik's eligibility.
टॅग्स :जितेंद्र आव्हाडमुंबई