मुंबई : राज्यात यंदा एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कट ऑफमध्ये चांगलीच घट झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) सुरू असलेल्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये सरकारी कॉलेजांमधील प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ यंदा ५०९ गुणांपर्यंत घसरला आहे.
गेल्यावर्षी सरकारी मेडिकल कॉलेजांचा प्रवेशाचा कट ऑफ ६४२ एवढा उच्च लागला होता. तर, यंदा खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशाचा कट ऑफही ४७९ गुणांपर्यंत खाली आला आहे.
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या ६४ कॉलेजांतील ८,१३८ जागांवरील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जात आहे. त्यामध्ये यंदा सरकारी कॉलेजांसह खासगी कॉलेजांच्या कट ऑफ यंदा चांगलीच घट झाली आहे.
काठिण्य पातळीचा परिणाम
कोरोनानंतर नीट परीक्षेची काठिण्य पातळी घटविली होती. यंदा ही काठिण्य पातळी कोरोनापूर्वीप्रमाणे करण्यात आली होती, तसेच एकाच प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय काहीसे साधर्म्य असलेले देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडविताना अधिक वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेल्याने कट ऑफ घसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सीईटी सेलकडून राबविण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत कट ऑफमध्ये मोठी घट झाल्याचे दिसत आहे.
फिजिक्सचा पेपर गेला अवघड
गेल्यावर्षी राज्यात एमबीबीएसच्या प्रवेशाचा कट ऑफ अधिक लागला होता. त्यामध्ये नीट परीक्षेची सोपी प्रश्नपत्रिका हे कारण दिले गेले होते. बहुतांश विद्यार्थ्यांना फिजिक्स विषयाचा पेपर अवघड गेल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते.
गेल्यावर्षी शेवटच्या फेरीला काही कॉलेज आली होती. त्यामुळे आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेशासाठी कमी जागा असल्याने कटऑफ अधिक राहिला होता. यंदा पहिल्या फेरीलाच सर्व कॉलेज प्रवेश प्रक्रियेत आली आहेत. यंदा नीट परीक्षेची काठिण्यपातळीही वाढविल्याने कटऑफ घटला आहे. नीट परीक्षेची काठिण्यपातळी याच पद्धतीने राहणे आवश्यक आहे - सुधा शेनॉय, पालक प्रतिनिधी