मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी महापौरांचा लोकल रेल्वे प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 19:48 IST2021-02-17T19:48:13+5:302021-02-17T19:48:55+5:30
मास्क न लवणाऱ्यांचे काढणार फोटो

मास्कचे महत्व पटवून देण्यासाठी महापौरांचा लोकल रेल्वे प्रवास
मुंबई - लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झाल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत लॉक डाऊन करण्याची वेळ येईल, असा इशारा महापौरकिशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तर मास्क लावण्याचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी बुधवारी रेल्वेने प्रवास केला. तसेच यापुढे मास्क न लावणाऱ्या लोकांचा फोटो घेऊन ते संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल, असा इशारा महापौरांनी दिला.
मुंबईत कोरोनाचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे महापालिकेने १ फेब्रुवारीपासून लोकलसेवा सर्वांसाठी सुरू केली. मात्र प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे गेल्या दोन आठवड्यांच्या कालावधीत बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. यामुळे मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याचे संकेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी विशेषतः रेल्वे प्रवासात नागरिक मास्क लावत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापौरांनी बुधवारी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रूझ स्टेशनपर्यंत धिम्या गतीच्या लोकलने प्रवास करीत स्वतः परिस्थितीचा आढावा घेतला.
मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन नागरिकांमध्ये अधिक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या पाहणीत लोकलमध्ये ९० टक्के लोकांनी मास्क घातले होते, तर १० टक्के लोकांनी मास्क घातले नसल्याचे आढळून आले असे महापौरांनी सांगितले. कोरोनाची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी याप्रकारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मास्क न लावल्यास काढणार फोटो...
काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचा फटका इतर लोकांना बसत आहे. त्यामुळे यापुढे मास्क न घातलेले नागरिक आढळून आल्यास त्यांचा फोटो घेऊन ते संबंधित पोलीस स्टेशनला कळविण्यात येईल, जेणेकरून त्यांच्यावर सक्त कारवाई होऊन नागरिकांमध्ये चांगला संदेश देण्यास मदत होऊ शकेल, असे महापौरांनी सांगितले.