Join us  

'मातोश्री' बैठकीत सत्तार-खैरे वाद संपुष्टात; एकत्र काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 8:18 PM

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले.

मुंबई - औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची बातमी पुढे आल्याने शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. अब्दुल सत्तार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी पक्षातील नेत्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आलं होतं. या बैठकीत पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन्ही नेत्यांना एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. 

ही बैठक संपल्यानंतर चंद्रकांत खैरे, अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकत्र बाहेर पडले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांना हातात हात मिळवित आता कोणतेही वाद नसल्याचं माध्यमांना सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, पक्षप्रमुखांनी आदेश दिलेत जे झालं ते झालं, यापुढे पक्षाच्या चौकटीत काम करा, एकत्र येऊन पक्षशिस्तीत काम करावं, समज-गैरसमज दूर झालेले आहेत. मंत्र्यांनी राजीनामा दिला हे कधीच नव्हतं. त्या फक्त विरोधकांच्या अफवा होत्या. मुख्यमंत्र्यांसमोर या सगळ्या गोष्टींवर पडदा पडलेला आहे. दोघांनीही एकत्र येत काम करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सगळे आमदार आणि पदाधिकारी एकत्र येऊन काम करतील याची खात्री दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे असं त्यांनी सांगितले. 

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. वाद मिटले आहेत. संघटनेच्या शिस्तीनं काम करु, ते आमच्या पक्षाचे मंत्री आहेत तर आम्ही नेते एकत्र मिळून आगामी निवडणुकीत काम करु असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले तसेच एकनाथ शिंदे, पक्षाचे नेते यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. समज-गैरसमज दूर झालेत. मातोश्रीने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन केलं जाईल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून शिवसेनेचा वाद विकोपाला गेल्याचे समोर आलं होतं.  यातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर भाष्य करत त्यांच्यामुळेच औरंगाबाद जिल्हा परिषदचे उपाध्यक्षपद भाजपाला मिळाल्याचा आरोप केला होता.  शिवसेना संघटनेशी त्यांनी गद्दारी केली. मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी हिरव्या सापाला येऊ देणार नाही, त्यांनी खरा रंग दाखवला. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार तसेच, अब्दुल सत्तार यांना 'मातोश्री'ची पायरी चढू देणार नाही, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी  अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं.  

टॅग्स :अब्दुल सत्तारचंद्रकांत खैरेशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे