मुंबई - मुंबईच्या धावपळीत माणुसकीचे दर्शन घडवणारी एक हृदयस्पर्शी घटना घाटकोपर रेल्वे स्थानकावर घडली. नायर रुग्णालयात डिलिव्हरीसाठी निघालेल्या फातुमा फैजुल्ला शेख या गर्भवतीला लोकल ट्रेनमध्येच प्रसूती कळा सुरू झाल्या. ती घाटकोपर रेल्वे स्थानकात उतरली. पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथेच तिने बाळाला जन्म दिला.पोलिसांच्या प्रसंगावधानाने बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत.
कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ९ यादव वाजण्याच्या सुमारास, सीएसटीकडे जाणाऱ्या स्लो लोकलमधील फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करत असताना फातुमा यांना अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. त्या नायर रुग्णालयात प्रसूतीसाठी जात असताना, परिस्थिती गंभीर होत चालल्याने त्यांनी घाटकोपर स्थानकात उतरण्याचा निर्णय घेतला. याच वेळी ड्युटीवर असलेले पोलिस हवालदार संभाजी जाधव, महिला होमगार्ड फिरदोस खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत रेल्वे हेल्पलाइनकडून तातडीचा संदेश मिळाला.
या सर्वांनी मिळून फातुमा हिला तातडीने घाटकोपरजवळील राजावाडी रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल होताच फातुमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फातुमा या टिटवाळा येथील रहिवासी असून, तिच्या पतीने पोलिसांचे मनापासून आभार मानले.