Join us  

मॅच फिक्सींग... फक्त तारीख टाकायची होती, आव्हाडांनी शेअर केला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 4:25 PM

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही राज  यांनी जाहीरपणे दिला.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक माहिती सांगितली होती. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असून दुसरा हाजी अली निर्माण करण्यात येत असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीर सभेत दाखवला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत मजारवर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्यानुसार, तातडीने कारवाई करत प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, ही कारवाई म्हणजे मॅच फिक्सींग असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. 

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही राज  यांनी जाहीरपणे दिला. मात्र, राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी कारवाईची मोहिम हाती घेतली. मुंबई प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला, त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यात आले. तर, ही संपूर्ण जागा पूर्ववत करण्यात आली आहे. आता, या कारवाईवरुन अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईच्या जिल्हाधिकारी यांचा आदेश ट्विटरवरुन शेअर केलाय. त्यासोबतच, ही मॅच फिक्सींग असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 

Match Fixing … इतक्या उघडपणाने, मुंबईकर हुशार आहेत… बाकी सगळे टाइप करुन ठेवले होते, तारीख फक्त टाकायची होती, असे आव्हाड यांनी म्हटलंय. तसेच, २००७ मध्ये ही बातमी पहिल्या पानावर छापून आली होती, असा संदर्भही आमदार आव्हाड यांनी सांगितलाय. 

दरम्यान, आव्हाड यांनी शेअर केलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात २३ मार्च रोजी सकाळी ८ वाजता कारवाई करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पथकही नेमण्यात आल्याचे सांगितले आहे. यावर पेनाने २२ तारीख टाकल्याचे दिसून येत. त्यावरुन, आव्हाड यांनी ही मॅच फिक्सींग असल्याचे म्हटले. दरम्यान, संवेदनशील विषय असल्याने रात्रीच कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले असतील, असे एका ट्विटर युजर्सने म्हटले आहे. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे

सदर प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत आणि माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्या विभागाचे दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं. मात्र जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल..नाहीतर येवढे वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होते. अशा राज्यात अनेक गोष्टी असतील, तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

 

टॅग्स :राज ठाकरेमनसेजितेंद्र आव्हाडमाहीम