निवडणूक कामाचे ३५ जणांना ‘मास्टर’ प्रशिक्षण; ६४ हजार कर्मचाऱ्यांना सोमवारपासून देणार धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 10:02 IST2025-12-27T10:02:46+5:302025-12-27T10:02:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी १० हजार २३१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्याकरिता ६४ हजार ३७५ अधिकारी ...

निवडणूक कामाचे ३५ जणांना ‘मास्टर’ प्रशिक्षण; ६४ हजार कर्मचाऱ्यांना सोमवारपासून देणार धडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी १० हजार २३१ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्याकरिता ६४ हजार ३७५ अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ३५ प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (मास्टर प्रशिक्षण) शुक्रवारी पालिका प्रशासनाकडून पार पडले. आता हे ३५ प्रशिक्षक २९ डिसेंबरपासून सात केंद्रांवर तीन सत्रांमध्ये उर्वरित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.
ईव्हीएम यंत्र हाताळणी, या यंत्रांची सुरक्षितता राखणे, मतदान साहित्य हाताळणी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या सुलभतेसाठी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे, मतदानाआधी चाचणी मतदान (मॉक पोल), मतदानपूर्व कामकाजाचे नियोजन, मतदार ओळखपत्र तपासणे, ईव्हीएम यंत्र सील करणे यासोबतच प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी नेमून दिलेल्या कर्तव्याबाबतचे प्रशिक्षण शुक्रवारी ३५ प्रशिक्षकांना देण्यात आले. आता ते उर्वरित अधिकारी व कर्मचारी कामकाजाचे धडे देणार आहेत.
‘या’ केंद्रांवर कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था
सात ठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात शहर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ना.म. जोशी मार्ग महापालिका शाळा येथील तळमजला, भायखळा येथील राणीच्या बागेतील अण्णा भाऊ साठे सभागृह, शीव रुग्णालयातील मुख्य सभागृहाचा समावेश आहे.
पश्चिम उपनगरातील कर्मचाऱ्यांसाठी बोरिवली पश्चिमेतील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, विलेपार्ले पूर्वेतील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे सभागृह, वांद्रे पश्चिमेतील पटवर्धन पार्कच्या बाजुला असलेले बालगंधर्व सभागृह येथे प्रशिक्षण दिले जाईल. पूर्व उपनगरातील कर्मचाऱ्यांना मुलुंड पश्चिमेतील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाजवळील महाकवी कालिदास नाट्यगृह येथे मार्गदर्शन केले जाणार आहे.
निवडणूक संपेपर्यंत सर्व विभागांतील कर्मचारी आणि अधिकारी यांना रजा किंवा सुट्टी घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे.