Join us
Daily Top 2Weekly Top 5

डहाणूमध्ये गोदामाला मध्यरात्री भीषण आग, हजारो क्विंटल भात जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 11:45 IST

घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या गोदामातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क, कासा: आदिवासी विकास महामंडळाच्या  डहाणू तालुक्यातील कासा  कार्यालयांतर्गत येणाऱ्या घोळ येथील भात गोदामाला सोमवारी रात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. या गोदामात शेतकऱ्यांचा यावर्षी खरेदी केलेला जवळपास ३ हजार क्विंटलच्यावर भात साठवून ठेवला होता. अचानक लागलेल्या आगीत साठवलेला भात जळून खाक झाला आहे.  मात्र  आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना सोमवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली. गोदामातील भातासह बारदाणे (गोणपाट) यांनीही पेट घेतल्याने आगीने भडका घेतला. आगीची माहिती मिळताच बोईसर, डहाणू येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझविण्याचे अथक प्रयत्न  केले. 

आगीवर नियंत्रण, उर्वरित धान्य वाचले

आगीवर नियंत्रण मिळवल्याने उर्वरित धान्य वाचले. जेसीबीच्या साह्याने उर्वरित भात बाजूला करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने पोलिस व महामंडळ अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर पोलिस व महामंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मंगळवारी सकाळी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा करून नुकसानीचा अंदाज घेतला.

आदिवासी विकास महामंडळाच्या घोळ येथील  भात गोदामाला रात्री अचानक आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिक व कर्मचाऱ्यांकडून मिळाली. तत्काळ अग्निशमन दल व पोलिसांना पाचारण  करून आग  विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. पंचनाम्यानंतर किती नुकसान झाले हे स्पष्ट होईल.-योगेश पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, विकास महामंडळ, जव्हार

टॅग्स :आग