मुंबै महोत्सवात मराठमोळी ‘जोडी तुझी माझी’ सौंदर्य स्पर्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 20:01 IST2023-12-21T20:01:23+5:302023-12-21T20:01:32+5:30

या स्पर्धेमध्ये नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण अशा कोणत्याही जोडीला सहभागी होता येणार आहे.

Marathmoli 'Jodi Tuzhi Majhi' beauty pageant at Mumbai Festival! | मुंबै महोत्सवात मराठमोळी ‘जोडी तुझी माझी’ सौंदर्य स्पर्धा!

मुंबै महोत्सवात मराठमोळी ‘जोडी तुझी माझी’ सौंदर्य स्पर्धा!

मुंबई - जीवनाधार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या मुंबै महोत्सवामध्ये ‘जोडी तुझी माझी’ या आगळ्यावेगळ्या मराठमोळ्या ‘मुंबै सौंदर्यवान स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये नवरा-बायको, वडील-मुलगी, आई-मुलगा, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रीण अशा कोणत्याही जोडीला सहभागी होता येणार आहे.

३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत ‘मुंबै महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून ‘मुंबै सौंदर्यवान २०२४’ स्पर्धा १ जून २०२४ रोजी नववर्षाच्या आरंभीच अंधेरीतील कंट्री क्लबमधील खुल्या मंचावर होणार आहे. ‘जोडी विशेष मराठमोळी सौदर्य स्पर्धा’ या वेगळ्या संकल्पनेवर आधारीत असलेल्या या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी जोडीने सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या पारंपरिक वेशभूषेसह स्पर्धकांना सहभागी होता येईल. 

सहभागी होण्यासाठी नाते किंवा वयाचे बंधन नाही. प्रथम प्रवेश घेणाऱ्या ५० जोड्यांना स्पर्धेमध्ये सहभाग दिला जाईल. प्रथम तीन सर्वोत्कृष्ट विजेत्या जोडयांसह सर्वोत्कृष्ट पुरुष, सर्वोत्कृष्ट स्त्री, सर्वात तरुण जोडी, सर्वाधिक वयाची जोडी, ब्रेन अँड द ब्युटी अशा गटांमध्ये प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २५००० रुपये, २०००० रुपये व १५००० रुपये रोख आणि नंतरच्या प्रत्येक गटात ७५०० रुपये रोख आणि क्राऊन व फेटा, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

निवड चाचणी २३ डिसेंबर रोजी, तर अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्यांसाठी २३ डिसेंबर रोजी सराव फेरी होणार आहे. मुख्य स्पर्धा कॉमन रॅम्प वॉक, ड्युओ रॅम्प वॉक, वैयक्तिक रॅम्प वॉक आणि प्रश्नोत्तर फेरी अशा एकूण चार फेऱ्यांमध्ये होईल. मूळ महाराष्ट्रीयन पारंपरिक वेशभूषा, फॅशन डिझाईनसहित सभ्यतादर्शक कोणतीही वेशभूषा या स्पर्धेत चालू शकेल.

व्हिजन आणि सुप्रिया प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने सातवा पाच दिवसीय ‘मुंबै महोत्सव’ साजरा होत आहे. यात पर्यावरणपूरक ‘मुंबै सायक्लोथॉन’ सायकल रॅली स्पर्धा, नाद अर्थात फोक मेश अप, ये लावणीचे बोल कौतुके आणि मराठी पाऊल पडते पुढे हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुंबईच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही होणार आहे.

Web Title: Marathmoli 'Jodi Tuzhi Majhi' beauty pageant at Mumbai Festival!

टॅग्स :Mumbaiमुंबई