शिवडीत आवाज मराठीचाच; संघटनांची ताकद व भावनिक आवाहनांची झुंज : घरे, पाणी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 09:35 IST2025-12-26T09:35:20+5:302025-12-26T09:35:33+5:30
लोकसभा, विधानसभा असो वा महापालिका निवडणूक ही केवळ पक्षीय समीकरणांवर ठरते. त्यामुळे येथे संघटनांची ताकद व भावनिक आवाहन यांची थेट झुंज होणार आहे.

शिवडीत आवाज मराठीचाच; संघटनांची ताकद व भावनिक आवाहनांची झुंज : घरे, पाणी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर
- महेश पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघाला गिरणगावाची पार्श्वभूमी, कोळीवाडे, जुनी चाळ व्यवस्था, झोपडपट्ट्या अशी पार्श्वभूमी आहे. मात्र, या भागाचा वेगाने पुनर्विकास होत असल्याने मूळचा मराठी टक्का हळूहळू घसरत चालला आहे.
लोकसभा, विधानसभा असो वा महापालिका निवडणूक ही केवळ पक्षीय समीकरणांवर ठरते. त्यामुळे येथे संघटनांची ताकद व भावनिक आवाहन यांची थेट झुंज होणार आहे. विकासाच्या घोषणांपेक्षा येथील मराठी मतदारांमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांची राजकीय कसोटी शिवडी विधानसभा मतदारसंघात लागणार आहे.
शिवडीतील परळ, लालबाग, काळाचौकी, कॉटन ग्रीन या भागांत अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीची पकड मजबूत आहे. त्यामुळेच हा उद्धवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मराठी मतदार येथे बहुसंख्य असो तरी झोपडपट्टीचे पुनर्वसन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन व घरांचा प्रश्न मतदारांसाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी असली तरी येथील मतदार अन्य ठिकाणी वळण्याची शक्यता नसल्याने भाजप व शिंदेसेनेला येथे मोठी लढत द्यावी लागणार आहे.
पारंपरिक मतदारांमुळे युतीचा विजय?
२०१७ च्या पालिका निवडणुकीत येथील पाचही प्रभागांत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असून, पक्षफुटीनंतरही ते उद्धवसेनेसोबत राहिले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे अजय चौधरी यांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा ७,१४० मतांनी पराभव केला होता.
प्रभाग क्र. २४४ व २०५ मध्ये नांदगावकर यांनी जास्त मते घेतल्याने पालिका निवडणुकीत मनसेने शिवडीतील दोन प्रभागांवर दावा केला आहे. मात्र, युतीमुळे पारंपरिक मतदार एकत्र येऊन शिवडीमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
स्थानिकालाच उमेदवारी
शिवडी कोळीवाड्यात कोणत्याही पक्षांचे झेंडे दुय्यम ठरतात. स्थानिक अस्मिता, समुद्राशी निगडीत प्रश्न व पुनर्विकासाच्या नावाखाली होणारी हकालपट्टी हे येथील मुद्दे निर्णायक ठरतील. बाहेरचा उमेदवार दिल्यास येथे धक्का बसू शकतो, अशी स्थिती असल्याने स्थानिक उमेदवार देण्यावरच सर्व पक्षांचा भर आहे.
विधानसभा निवडणुकीतील प्रभागनिहाय मते
प्रभाग अजय बाळा
चौधरी नांदगावकर
२०२ १२,३८९ ११,१०४
२०३ १३,०३८ १३,०२७
२०४ ११,२४५ १३,३०७
२०५ १२,८६८ १३,५९२
२०६ १०,९९४ ७,५२३
२०१७ च्या महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवार
प्रभाग विजयी पक्ष मते
२०२ श्रद्धा जाधव उद्धवसेना १२,०३२
२०३ सिंधू मसुरकर उद्धवसेना १४,५४०
२०४ अनिल कोकीळ उद्धवसेना १३,४१०
२०५ दत्ता पोंगडे उद्धवसेना १३,८५९
२०६ सचिन पडवळ उद्धवसेना ७,२५५