मराठी मतदारांची अधिक पसंती आम्हालाच : शेवाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 09:25 IST2026-01-11T09:24:23+5:302026-01-11T09:25:32+5:30
शिंदेसेना भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप हा पूर्णपणे राजकीय

मराठी मतदारांची अधिक पसंती आम्हालाच : शेवाळे
सुजित महामुलकर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेनेच्या 'खऱ्या' वारसावरून सुरू असलेली राजकीय धुसफूस अधिक तीव्र होत आहे. 'भाजपची बी टीम' हा शिक्का झटकून, मराठी मतदारांचा खरा कौल आमच्याच बाजूने असल्याचा दावा करत शिंदेसेनेचे सरचिटणीस व माजी खासदार राहुल शेवाळे आक्रमक भूमिका घेतली आहे. रस्ते, ड्रेनेजपासून विकास आराखड्यापर्यंत, आरोप-प्रत्यारोपांच्या या लढाईत शेवाळेंनी 'लोकमत'शी बोलताना उद्धवसेना आणि भाजप दोघांनाही थेट आव्हान दिले आहे.
२५ वर्षे महापालिकेवर सत्ता असूनही मुलभूत प्रश्न सुटले नाहीत. मतदारांनी पुन्हा महायुतीवर विश्वास का ठेवावा?
शेवाळे : मुंबई महापालिकेत आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होतो, हे खरे आहे. मात्र, त्या काळात केंद्र आणि राज्य सरकारचे अपेक्षित सहकार्य वेळेवर मिळाले नाही. त्यामुळे अनेक धोरणात्मक निर्णय अडकले. सर्वांत मोठी चूक म्हणजे विकास नियोजन आराखड्याची (डीपी) प्रभावी अंमलबजावणी न होणे. सध्या या आराखड्याची केवळ २ टक्केच अंमलबजावणी झाली. आता २०३४ पर्यंतच्या प्रस्तावित डीपीची पूर्ण आणि काटेकोर अंमलबजावणी करणे हे आमचे प्राधान्य आहे.
तुमचा पक्ष म्हणजे भाजपची 'बी टीम' असा आरोप होतो. महापालिकेत स्वतंत्र ओळख कशी दिसणार?
शेवाळे : शिंदेसेना भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप हा पूर्णपणे राजकीय आहे. वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आम्ही आमचे स्वतंत्र अस्तित्व ठामपणे सिद्ध केले आहे. लोकसभेत भाजपने ९ जागा जिंकल्या, तर आम्ही ७ जागा जिंकल्या. विधानसभेत ८० जागांवर लढून आम्ही ६० जागा जिंकल्या. विशेष म्हणजे मुंबईत उद्धवसेना आणि भाजपपेक्षा आम्हाला मराठी मतदारांनी अधिक पसंती दिली. आम्हाला ४३.७ टक्के मतदान झाले, जे दोन्ही पक्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे 'बी टीम'चा प्रश्नच येत नाही.
मुंबईत १२५ माजी नगरसेवक असताना तुम्हाला केवळ २० जागा दिल्या गेल्या. स्वतंत्र लढलो असतो, तर पक्ष अधिक मोठा झाला नसता का?
शेवाळे : गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपच्या चिन्हाविरुद्ध आमच्या स्वतंत्र चिन्हावर लढलो होतो आणि ८५ जागा जिंकल्या. यावेळी त्या ८५ जागांत ५ जागांची वाढ करून आम्हाला २० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे वाटाघाटी आमच्या राजकीय ताकदीच्या आधारावरच झाली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 'खरी शिवसेना' मानणारा मतदार अजूनही आहे. त्यांची मने कशी जिंकणार?
शेवाळे : नगरविकास आणि गृहनिर्माण ही दोन्ही महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळे मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्ष मार्गी लागत आहेत. बीडीडी चाळींचा पुनर्विकास असो, धारावी पुनर्वसन असो, 'म्हाडा'च्या इमारती किंवा पागडी पद्धतीच्या जुन्या चाळी या सगळ्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जात आहेत. यामुळे मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत परत येईल आणि शहरातील मराठी भाषिकांचा टक्का वाढेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.