मुंबईत पु्न्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळून आला आहे. घाटकोपर पूर्वेला एका सोसायटीमध्ये गुजराती व्यक्तीकडून मराठी कुटुंबाचा अपमान झाल्याचा प्रकार घडल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मराठी कुटुंबाच्या मांसाहार करण्यावरुन गुजराती व्यक्तीनं मराठी कुटुंबाला त्रास दिल्याचा आरोप केला आहे. "तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाता है", अशा शब्दात गुजराती व्यक्ती मराठी कुटुंबाला टोमणे मारत होता अशी तक्रार समोर आली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि सोसायटीच्या सदस्यांना याबाबत जाब विचारला.
मनसेनं आपल्या स्टाइलनं सोसायटीच्या अमराठी सदस्यांना घडलेल्या घटनेचा जाब विचारला आणि मराठी माणसाचा अशापद्धतीचे अपमान खपवून घेतला जाणार नाही असाही इशारा दिला. समोर आलेल्या माहितीनुसार या सोसायटीमध्ये फक्त ४ मराठी कुटुंब राहतात. इतर सर्व गुजराती कुटुंब याठिकाणी राहतात. त्यामुळे गुजराती व्यक्तींकडून मराठी नागरिकांना त्रास दिला जात असल्याची तक्रार मराठी कुटुंबाने मनसेकडे केली होती.
घाटकोपरमधील मनसेचे पदाधिकारी राज पार्टे यांनी सोसायटीमध्ये धाव घेत सोसायटीच्या अमराठी सदस्यांना जाब विचारला आणि इशारा दिला. "सोसायटीमध्ये जरी ४ मराठी कुटुंब राहत असली तरी याठिकाणी जर का मराठीचा मुद्दा आला तर ४ हजार मराठी लोक इथं उभे राहतील आणि धडा शिकवतील", असंही राज पार्टे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वादाने डोकं वर काढलं आहे. त्यात मनसेनं मराठी भाषेवरुन आक्रमक पवित्रा घेत बँकांमध्ये मराठीचा वापर होते की नाही हे पाहण्यासाठीची मोहिम राबवली होती. बँकांमध्ये धडक देत सर्व कारभार मराठीत उपलब्ध करुन देण्याबाबत मनसैनिकांनी बँक व्यवस्थापकांना निवेदनं दिली होती. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना दम देखील भरला होता.