Join us

ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:17 IST

काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुंबई - ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे मुंबई सोडणार नाहीत. सरकार आपल्या मागण्यांवर अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे उद्यापासून पाणीही सोडणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आझाद मैदानावर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उद्यापासून पाणी बंद करणार आहे. सरकार मागण्यांच्या अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे उद्यापासून कडक आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल असं एकही पाऊल कुणी उचलायचे नाही. आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांतता राखायची. काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सोबतच येत्या शनिवारी-रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरात थांबणार नाही. आम्ही इथून सांगितले, शनिवारी-रविवारी मुंबईत या तर मुंबईच सोडा, इथून १००-२०० किमी रांगा लागतील. आपण जे बोलतो ते करतो. ओबीसीतून आरक्षण घ्यायला मी खंबीर आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे. काहीही झाले तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार. मुख्यमंत्र्‍यांनी याला गर्दी समजू नये तर समाजाची वेदना समजावी असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, गरीब मराठ्यांची लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जातीधर्माचे लोक आमच्या गरिब मराठ्यांची सेवा करतायेत. त्यामुळे याला गर्दी समजू नका. राज्यभरातून मुंबईकडे येताना सुरक्षित ठिकाणी पार्किंगमध्ये वाहने पार्क करा, रेल्वेने आझाद मैदानला यावे. वाशी, शिवडी, मस्जिद बंदर कुठेही मैदानात वाहने पार्क करा. इथं वाहने पार्किंग करायला जागा नाही. नवी मुंबईत वाहने लावा तिथून रेल्वेने प्रवास करा असं आवाहन जरांगे पाटील यांनी केले. 

माझ्या नावावर पैसे मागू नका... 

ग्रामीण भागातून जेवण येतंय त्यांनी जिथे जिथे लोक थांबलेत तिथेच वाटप करावे. डायरेक्ट ट्रक भरून इथं येऊ नका. अन्नछत्र सुरू केलेत, मात्र त्याच्या नावावर कुणी पैसे मागू नका. रेनकोटच्या नावाखाली पैसे घेतले जातायेत. मी पुराव्यासह नाव घेईन. एक रूपयाही कुणाला द्यायचा नाही. जर कुणाला पैसे दिले असतील तर परत मागा. माझ्या नावावर पैसे कुणी घेऊ नका. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कुणाला पैसे देऊ नका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

राज ठाकरे कुचक्या कानाचे... 

ठाकरे ब्रँड चांगला आहे, पण राज ठाकरे विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नावर बोलतो, तुम्हाला आम्ही विचारले का, तुम्हाला १३ आमदार निवडून दिले, ते पळून गेले. तुम्ही मराठवाड्यात का आला आम्ही तुम्हाला विचारले होते का? लोकसभेला फडणवीसांनी तुमचा गेम केला, विधानसभेला तुमचं पोरगं त्यांनी पाडले तरी तुम्ही त्यांची बाजू ओढून घेता. राज ठाकरे मानाला भुकेलेला माणूस आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला ते खुश होतात, मग त्याला त्याचा पक्ष बर्बाद झाला तरी चालतो. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर केला. 

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलमराठा आरक्षणअन्य मागासवर्गीय जातीदेवेंद्र फडणवीसराज ठाकरे