Join us  

Mumbai Bandh: मुंबई बंदवरून मराठा समाजाच्या गटांमध्येच मतभिन्नता; एक गट ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 3:28 PM

Mumbai Bandh: एका गटाने बुधवारी मध्यरात्री 12 पासूनच मुंबई बंद करण्याचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

मुंबई : मराठा आंदोलनकर्त्यांनी उद्या, 9 ऑगस्टला पुन्हा मुंबईला वेठीस न धरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, एका गटाने बुधवारी मध्यरात्री 12 पासूनच मुंबई बंद करण्याचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या गटाच्या मुंबई बंद करण्याच्या भुमिकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे इतर गटांनी सांगितले आहे. सकल मराठा समाजाच्या मुख्य समितीने मुंबईसह इतर चार ठिकाणे बंद मधून वगळत मुंबईत केवळ ठिय्या आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र, अन्य गटांचे नेतृत्व करणाऱ्या अमोल जाधवराव यांच्या  गटाने शांततेत मुंबई बंद करणार असल्याचे सांगितले आहे. मुंबई बंद दरम्यान कोणतीही हिंसा होणार नसल्याचे जाधवराव यांनी सांगितले.आपल्या समाजातील काही लोकांना राज्य सरकारला कोणताही त्रास होणे नको आहे. यामुळे ते आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोंडी आश्वासने नको, राज्य सरकारने लेखी द्यायला हवे. तोपर्यंत मराठा आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा जाधवराव यांनी दिला आहे.  तर, सकल मराठा समाजातर्फे आंदोलकांचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी समन्वयाचा अभाव आणि मतभेदांमुळे त्यांनी ही भुमिका घेतली असल्याचे सांगितले. आम्हाला शांततेत आंदोलन करायचे होते, मात्र काही समाजकंटकांनी मराठा समाजाच्या नावावर चाकण, नवी मुंबईमध्ये आंदोलनाला हिंसक वळण दिले. अशा हिंसक आंदोलकांना आम्ही टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्याशी संपर्क साधून समजुत घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ते जे काही करणार आहेत त्याला आमचा पाठिंबा नसल्याचे, पवार यांनी स्पष्ट केले.  दुसरीकडे मराठा आंदोलनाचा जुलैपासून दुसरा टप्पा सुरु करणाऱ्या बीडमधील आंदोलकांनी कालच आंदोलन नोव्हेंबरपर्यंत स्थगित करत असल्याचे सांगितले आहे.

टॅग्स :मुंबई बंदमहाराष्ट्र बंदमराठा क्रांती मोर्चामराठा आरक्षण