Join us

मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 08:14 IST

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले.

- सुजित महामुलकर मुंबई - मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यामुळे काही आंदोलकांनी काही दिवस मुकाम होणार हा अंदाज बांधत मोठ्या गाड्यांमध्ये गॅस, शेगडी, जेवणाचे साहित्य घेऊन मुंबईत दाखल झाले. गेले दोन दिवस त्यांनी गाडीतच स्वयंपाक केला, असे बळिराम पोळ यांनी सांगितले.

आष्टी तालुक्यातील प्रशांत तरटे, मनोज तरटे यांनी चार मित्रांसह ट्रकमध्येच न्याहरी केली. आम्ही सोबत जेवणाचे साहित्य घेऊनच निघालो, असे त्यांनी सांगितले. काही आंदोलनकर्ते मात्र मोठ्या जोशात मुंबईत दाखल झाले आणि त्यांना उपवास घडला. काहीची खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली. वाडीबंदर येथे पोहोचल्यावर या भागात जवळपास हॉटेल नाही की चहाची टपरी सहजासहजी दिसत नव्हती, असे धाराशीवचे जयराम ढोके यांनी सांगितले.

खाऊगल्ल्या बंदआझाद मैदानालगत खाऊगल्ली आहे. येथे नेहमीच गर्दी असते. शुक्रवारी मात्र खाऊगल्ली बंद ठेवण्यात आली. या गल्लीचा परिसर खूपच चिंचोळा आहे. मोठी गर्दी जमल्यास अनर्थ होण्याची शक्यता लक्षात घेऊन ती बंद ठेवण्यात आली. त्यामुळे आंदोलकांसह अन्य मंडळींनी सीएसएमटी स्थानकासमोरील बोरा बाजार येथील खाऊगल्लीकडे मोर्चा वळवला होता. 

रस्त्याच्या कडेला मांडली शेगडी- पावसामुळे पांगलेल्या आंदोलकांपैकी काही जणांनी फुटपाथवरच ताडपत्री टाकून जेवण बनविण्यास सुरुवात केली. गॅस, शेगडीसह १५ दिवस पुरेल एवढा किराणा घेऊन ते आल्याचे नांदेडवरून आलेल्या अभी शिंदे याने सांगितले.- जवळपास दहा ते बारा जण एकत्र आल्याचे त्याने सांगितले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक आंदोलकांनी सोबत गॅस, किराणा आणला आहे. काही जणांनी महापालिका मुख्यालयाच्या मागच्या गेटकडे वाहने पार्क करून तिथेही जेवण बनवण्यास सुरुवात केली.- दोन दिवसांचा प्रवास करत मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले खरे, पण वाडीबंदर येथे सगळ्या गाड्या थांबल्यानंतर कार्यकर्त्यांचे खाण्यापिण्याचे हाल झाले. येथे हॉटेल कुठे आहे का, असा सवाल ते स्थानिकांना विचारात होते.

टॅग्स :मराठा आरक्षणमुंबई