- मनीषा म्हात्रे मुंबई - सीएसएमटी परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच आंदोलकांची गर्दी वाढत गेली. दुपारपर्यंत ही गर्दी इतकी वाढली की, संपूर्ण परिसर ठप्प झाला. आझाद मैदान, सीएसएमटी, पालिका मुख्यालय परिसरातील सर्वच मार्ग आंदोलकांनी गजबजून गेले होते. या परिस्थितीत पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलिस आयुक्त अभिनव देशमुख यांनी आंदोलकांना शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी अखेर मनोज जरांगे पाटील यांना थेट व्हिडीओ कॉल केला आणि आंदोलकांना मार्ग मोकळा करण्यासाठी विनंती केली.
सीएसएमटीच्या प्रवेशद्वारांवर वाहतूककोंडी झाली होती. जे जे उड्डाणपूलही बंद झाला. पोलिस उपायुक्तांची गाडी देखील वाहतूककोंडीत अडकली. आंदोलक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. घोषणाबाजी सुरूच होती. यावेळी पोलिस उपायुक्त प्रवीण मुंढे उपआयुक्त मुंढे यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना व्हिडीओ कॉल करून परिस्थितीबाबत सांगितले, तेव्हा जरांगे यांनीही आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही आंदोलक रस्ता मोकळा करण्यास तयार होत नव्हते. मुंढे, यांनी आंदोलकांना 'दादांचे ऐकणार नाही का?' असं म्हणत समजावण्याचा प्रयत्न केला. काही वेळाच्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या संयम आणि समन्वयामुळे गर्दी बाजूला झाली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
'देवालाच माहीत काय होणार'वाहतूककोंडीत अडकलेले अनेक चालक त्रस्त झाले होते. टॅक्सीचालक महेश वर्मा म्हणाला, हॉटेलसाठी सामान घेऊन जात आहे, पण दीड तासापासून अडकून आहे. आता देवालाच माहिती पुढे काय होणार, असे ते म्हणाला.
बसचालकाने जेव्हा हात जोडले...परिमंडळ १ च्या पोलिस उपायुक्त कार्यालयाबाहेरही ५० ते ६० आंदोलकांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. कोंडीत अडकलेल्या बसचालकाने आंदोलकापुढे हात जोडले. पोलिसांनी समन्वयकाकडे विनंती केल्यानंतर त्यांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. याकाळात काही वाहने दुसऱ्या मार्गान वळविण्यात आली. अखेर काहीशा गोंधळानंतर आंदोलक बाजूला हटले. वाहतूक सुरळीत करण्यात आली.