Maratha Reservation ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन थांबलं आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलक थांबले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना फळे भाजीपालाची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
"मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले आंदोलक मुंबई परिसरात आलेले आहेत. आंदोलक नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सद्यसस्थितीत मुक्कामी आहेत. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतमालाची व इतर खाद्य पदार्थाची आवक व पर्यायाने व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. परिणामी, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका हद्द व ठाणे महानगरपालिका हद्द व इतर जोडून असणाऱ्या महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांना भाजीपाला व इतर दैनंदिन खाद्यपदार्थांचा संभाव्य तुटवडा टाळण्याकरीता परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत उपाय योजना/पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे," असं शासनाच्या या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
मालवाहतुकीबाबत नेमक्या काय आहेत सूचना?
राज्यातील शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालाचे वेळेत वितरण करण्यासाठी व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तसेच वरील नमूद केलेल्या महानगरपालिका हद्दीतील ग्राहकांना दैनंदिन भाजीपाला, फळे व इतर सर्व खाद्य पदार्थ उपलब्ध करुन देण्यासाठी संचालक, पणन, कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य, कृषी पणन मंडळ, पुणे व सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी आपसात समन्वय साधून आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व संबंधित महानगरपालिका यांच्यासोबत संपर्क करुन ग्राहकांपर्यंत उपरोक्त शेतीमाल पोहण्याबाबतची दक्षता घ्यावी.
राज्यातील पुणे मार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे पनवेलनंतर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गे (अटल सेतु) बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व माल वाहतूकदारांनी मुंबई शहारातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोहचणार नाही, अशा पद्धतीने तसेच छोट्या मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना / ग्राहकांना विक्री करावा.
राज्यातील नाशिकमार्गे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होणारा शेतमाल थेटपणे बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी व माल वाहतूकदारांनी मुंबई शहारातील दैनंदिन वाहतुकीस बाधा पोहचणार नाही अशा पध्दतीने तसेच छोटया मंडईतील किरकोळ व्यापाऱ्यांना / ग्राहकांपर्यंत विक्री करावा.