मुंबईः सकल मराठा समाजाची हिंसक आंदोलनं ही राज्य सरकारसाठी चिंतेची बाब झाली आहे. या हिंसाचारामागे 'बाहेरचा हात' असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. मराठा आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून समाजकंटक अस्थिरता निर्माण करण्याचा डाव साधत आहेत. त्यांच्या हिसका दाखवण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 'स्पेशल १६' तुकड्या पाठवण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राला केली आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) सुनील पोरवाल यांनी केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांना या संदर्भातील पत्र पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या एका तुकडीत ८० ते १५० सशस्त्र जवान आणि महिला असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, तिबेट सीमा पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान या तुकड्यांमध्ये असतात. महाराष्ट्र राज्य पोलिसांची संख्या २ लाखाच्या आसपास आहे. रॅपिड अॅक्शन फोर्सचा ताफाही सज्ज आहे. परंतु, ९ ऑगस्ट आणि १६ ऑगस्टला होणारं मराठा आंदोलन हे राज्यव्यापी असेल आणि त्यासाठी अतिरिक्त कुमक अत्यावश्यक आहे, असं सूत्रांनी सांगितलं. ९ आणि १६ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनांदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यादृष्टीने सरकार सर्वतोपरी खबरदारी घेत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
गेल्या काही दिवसांत, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यासह अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली आहेत. दगडफेक, तोडफोड, रास्ता रोको, जाळपोळीमुळे सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण, हे प्रकार मराठा आंदोलकांनी केलेत की समाजविघातक शक्तींनी, याबद्दल शंका आहे. हे विघ्नसंतोषी लोक ९ आणि १६ तारखेलाही हिंसाचार घडवू शकतात, हे ओळखून राज्य सरकारने कडेकोड बंदोबस्तासाठी पावलं उचलली आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडं दूर राहावं, असा सावधगिरीचा सल्ला पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात सांगलीतील जाहीर सभेला मुख्यमंत्री गेले नव्हते. त्यांनी भाषणाचा व्हिडीओ पाठवला होता. त्याआधी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी ते पंढरपूरलाही गेले नव्हते.