Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासंदर्भाती मंत्रिमंडळ उपसमितीमधील प्रमुखांची आज महाराष्ट्राच्या महाअधिवक्तांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर वेगवान घडामोडी घडताना दिसून येत आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीकडून आज रात्रीतूनच प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
वर्षा बंगल्यावर फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ वर्षावर पोहोचले आहेत. मराठा आरक्षण उपसमिती आणि महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला जाण्याची शक्यता आहे.
या बैठकीमध्ये मराठा आरक्षण उपसमिती आणि महाअधिवक्त्यांशी झालेल्या बैठकीतील वृत्तांत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडला जाणार आहे. या बैठकीमध्ये आरक्षणावर काही निर्णय होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गोंधळ घालणाऱ्यांना जरांगेंनी सुनावले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत, या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. आज 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झालेल्या गोंधळावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं. सरकार दंगल घडवू शकतं. कारण माझी पोरं असं काही करत नाहीत. गोंधळ घालणारे सरकारचेच लोक असू शकतात. त्यामुळे ते असे वागले. सर्वांनी सावध राहा. इथं येणाऱ्या कुठल्याही नेत्याला त्रास देऊ नका, बाकी मी सगळे बघतो, असंही जरांगे पाटील म्हणाले.