Join us

Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 13:04 IST

Maratha Morcha : खासदार सुप्रिया सुळे यांनी काल आझाद मैदानावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी गोंधळ केला.

Maratha Morcha :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातून हजारो आंदोलक मुंबईत आले आहेत. या आंदोलनाला राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी गोंधळ केला. शरद पवार यांच्याविरोधात सुळे यांच्यासमोरच घोषणाबाजी सुरू केली. यामुळे काही काळ गोंधळ सुरू होता. दरम्यान, यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर दुसरीकडे, आरक्षणावरुन खासदार शरद पवार यांच्यावरही टीका सुरू आहेत. यावरून आज सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. 

"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भाजपावर जोरदार निशाणा साधला. "मी काल आंदोलनाला भेट दिली, ती माझी नैतिक जबाबदारी आहे. मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे. एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि नुसते समजून घेणे नाही तर त्यातून मार्ग काढणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तिथे फार काही झालेले नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय?, असा सवाल सुळे यांनी केला. 

महापालिकेने स्वच्छतेवर लक्ष द्यावे

 "काल मी आझाद मैदानावर गेले तेव्हा जरांगे पाटील यांना खूप थकवा आलेला होता. त्यामुळे ते आराम करत होते. आमची थोडक्यात चर्चा झाली. मी फक्त त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली. माझी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष द्यावे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महायुतीवर साधला निशाणा

मागील काही दिवसांपासून महायुतीमधील नेत्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात खासदार शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले जात आहे. यावरही आज सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मलाही गंमत वाटते की, एकीकडे आम्हाला संपलं, संपलं असे म्हणतात. छोटा पक्ष म्हणतात आणि इतकं मोठं आंदोलन उभे राहते तेव्हा त्याचा केंद्रबिंदू शरद पवारच होतात. त्यांचे 250 आमदार आहेत. तीनशे खासदार आहेत असा पक्ष शरद पवारांकडे वळतो ही कमालच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :सुप्रिया सुळेमराठा आरक्षणशरद पवारदेवेंद्र फडणवीसमनोज जरांगे-पाटील