Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दोन दिवसापासून जरांगे यांनी आमरण उपोषण केले. हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत, या आंदोलनाला राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या. आज 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत गोंधळ केला. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर झालेल्या गोंधळावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, गोंधळ घालणारे कोण आहेत ते बघा. त्या घटनेचे व्हिडीओ असतील, ते बघा. गोंधळ घालणारे सरकारने पाठवलेले लोक आहेत का ते बघायला हवं. सरकार दंगल घडवू शकतं. कारण माझी पोरं असं काही करत नाहीत. गोंधळ घालणारे सरकारचेच लोक असू शकतात. त्यामुळे ते असे वागले. सर्वांनी सावध राहा. इथं येणाऱ्या कुठल्याही नेत्याला त्रास देऊ नका, बाकी मी सगळे बघतो, असंही जरांगे पाटील म्हणाले.
यापुढे सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे
"पोरांनो नेते आल्यावर तुम्ही गोंधळ घातला तर तुमच्याकडे कोणी येणार नाही. इथे कोणीही येऊ द्या, भाजपाचा नेता किंवा आणखी कुठल्या पक्षाचा नेता, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा किंवा इतर पक्षाचा नेता इथे आल्यावर त्याला सन्मानाने वागवा. आपल्याला सहन होतंय तोवर त्यांचा सन्मान करायचा. परंतु, जेव्हा आपल्याला वाटेल की आरक्षण मिळत नाही तेव्हा बघू काय करायचं. परंतु, सध्या कुठल्याही पक्षाचा नेता इथे आला तरी उलट बोलू नका. आता यापुढे सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, असंही जरांगे पाटील म्हणाले.
आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदानावरील आंदोलनाला भेट दिली. यावेळी आंदोलकांनी सुळे यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे कारकडे जात होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा-लाख मराठा असी घोषणाबाजी केली.यावेळी आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना वाट काढून दिली आणि त्यांना कारपर्यंत पोहोचवले.