Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
"आम्ही कायदा सोडून कुठेही काहीही केलेले नाही. आम्ही चार महिन्यांपूर्वी सरकारला निवेदन दिले आहे, सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. याचिकाकर्ते सरकारवर का बोलत नाहीत. सरकारमुळे मुंबईची शांतता बिघडली असे याचिकाकर्ते का म्हणत नाहीत, असा सवाल जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळ्या जरी घातल्या तरीही मी आझाद मैदानावरुन उठणार नाही. निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे. आणखीन वेळ आहे. त्याआधीच तुम्ही निर्णय घ्या. ते जर मुंबईत आले तर कुठेच उभा राहण्यासाठी जागा राहणार नाही. कारण ती मोठ्या संख्या येणार आहे. म्हणून मी म्हणतोय तुम्ही गाफील राहू नका. या आंदोलनामागे कोणी नाही, यांचं काही होत नाही, आम्ही आरक्षण देत नाही. प्रत्येकवेळी तुम्ही बांधलेला अंदाज चुकत आला आहे. माझा समाज मला आयुष्यभर सोडणार नाही. माझ्यासाठी लोक पक्षाला लाथ मारु शकतात, असंही जरांगे म्हणाले.