- नारायण जाधव मुंबई - मराठा आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मराठा बांधवांनी 'दहा रुपयांत मुंबईत राहा मोफत' अशी शक्कल शोधून तसे मेसेज शुक्रवारी व्हायरल केले. शुक्रवारी सकाळी मुंबईत प्रवेश केल्यावर पोलिसांनी आंदोलकांची वाहने फ्री वे परिसरात अडवून ठेवली. यामुळे त्यांनी पायीच आझाद मैदान वा सीएसएमटी परिसर गाठला. त्यातच मनोज जरांगे यांनी सीएसएमटी आणि आझाद मैदान परिसर सोडण्याचे आदेश दिले. यामुळे आंदोलकांचे होणारे हाल टाळण्यासाठी मुंबईतील मराठा बांधवांनी अनोखी शक्कल लढविली आहे.
अशी आहे शक्कलसमाजबांधवाच्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर सीएसएमटी ते मज्जीद बंदर वा भायखळा असे दहा रुपयांचे लोकलचे रिटर्न काढा, यात तुम्हाला २४ तास लोकल, फलाटावर राहण्यास मिळेल, रेल्वेचे स्वच्छतागृह वापरण्यास मिळेल, पिण्याचे पाणी मोफत मिळेल, प्रशासनाचाही त्रास कमी होईल, महत्त्वाचे म्हणजे आझाद मैदान जवळ असल्याने पाहिजे तेव्हा तिथे जाता येईल, तसेच तिकीट असल्याने रेल्वे वा पोलिस कोणी अडवणारही नाही, असे आवाहन त्या मेसेजमध्ये केले आहे.
आरक्षण मिळेपर्यंत मुस्लीम बांधवही आझाद मैदानातमुंबई: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अन्य समुदायांचे नागरिकही आले आहेत. यामध्ये छ. संभाजीनगर येथील फुलंब्री बाजार समितीचे संचालक अजहर सय्यद हे २० कार्यकत्यांचा सहभाग आहे. मराठा बांधव हा मोठा भाऊ आहे. त्यांच्या न्याय्य लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झालो आहे, असे त्यांनी सांगितले.