मुंबईत 'छावा' जन्मला..! १४ वर्षांची प्रतिक्षा संपली; मानसी सिंहीण बनली आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 08:30 IST2025-01-18T08:29:12+5:302025-01-18T08:30:31+5:30
मानसी सिंहिणीच्या या छाव्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्कचे आकर्षण आणखी वाढले असून येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत 'छावा' जन्मला..! १४ वर्षांची प्रतिक्षा संपली; मानसी सिंहीण बनली आई
मुंबई - बोरिवलीतील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. या पार्कमधील प्रसिद्ध सिंहिण 'मानसी'नं अलीकडेच एका छाव्याला जन्म दिला आहे. या गोड बातमीनं पार्क प्रशासन आनंदाने भारावून गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून पार्क प्रशासन सिहिंणीच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. या छाव्याच्या जन्मामुळे एक, दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. विशेष म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या स्थापना दिवशीच या छाव्याचा जन्म झाला.
याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी म्हटलंय की, मानस आणि मानसी ही जोडी जुनागढवरून २०२२ मध्ये आणली होती. गेल्यावर्षी मानसी सिंहीण आजारी पडली. तब्बल १८ दिवस तिने काहीच खाल्ले नव्हते. बऱ्याच जणांनी तिची आशा सोडली होती. पण आम्ही काही जणांनी ठाम विश्वास ठेवून तिची अखंड शुश्रुषा केली. त्यातून ती बरी झाली. त्यानंतर मानस बरोबर तिचं मिलन केलं. त्या दोघांना एकत्र करणही सोपं नव्हतं. मानस सुरुवातीला डरकाळी फोडून तिच्या अंगावर धावायचा. तिला ओरबाडायचा. ही बिचारी घाबरून जायची पण आम्ही धीर न सोडता त्यांना पुन्हा पुन्हा एकत्र करायचो. हळूहळू ते एकत्र रुळले आणि चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले असं त्यांनी सांगितले.
तसेच गेल्यावर्षी गौरी ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्यांचं मिलन सुरू झालं. प्राणी रक्षक वैभव पाटील यांचा मला फोन आला. मी तशीच पिंजऱ्याकडे धावले. ३० सप्टेंबरला यांचं शेवटचं मिलन झालं आणि मानसीचा मिलन काळ संपला. मग ती त्याच्यापासून दूर बसायला लागली. आता दोघांमध्ये ती वर्चस्व गाजवू लागली. मानस जर तिच्या जवळ आला तर ती पंज्याचा फटका द्यायची. मग मानस बिचारा निमूटपणे दूर व्हायचा. आम्ही हे सगळे दिवस तिची काळजी घेत होतो. तिचा वाढीव आहार, बाळंतपणामधील टॉनिकची औषधं सगळं वेळच्या वेळी दिलं जायचं. गुरुवारी १०८ दिवस पूर्ण झाले आणि मानसीला लेबर पेन चालू झाल्या. मी अखंड सीसीटीव्ही समोर बसून तिच्या एक एक क्षणाचं निरीक्षण करत होते. तिचं जमिनीवर लोळण, पुन्हा पुन्हा मागे मान वळवून पिल्लू बाहेर आल की नाही ते पाहणं, पुन्हा पुन्हा कळा देणं हे पाहत होते असं विनया जंगले यांनी म्हटलं.
दरम्यान, विनया जंगले या सीसीटीव्हीसमोर बसून सिहिंणीच्या हालचालींवर लक्ष ठेवत राहिल्या. जर आणीबाणीची वेळ आली तर त्याचीही संपूर्ण तयारी प्रशासनाने ठेवली होती पण सुदैवाने ती वेळच आली नाही. गुरुवारी रात्री तिने साडे नऊ वाजता पिल्लाला जन्म दिला. रात्रभर नॅशनल पार्कचे गार्ड अमित राणे पिंजऱ्याच्या बाहेर जागत होते. पहाटे तीन वाजता ती पिल्लाला दूध पाजायला लागली आणि तेव्हा सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला असा अनुभव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनया जंगले यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला. मानसी सिंहिणीच्या या छाव्यामुळे संजय गांधी नॅशनल पार्कचे आकर्षण आणखी वाढले असून येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.