मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या आंदोलनाला आता आणखी एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. या आंदोलनाची मुदत आज संध्याकाळी ६ वाजता संपणार होती, मात्र आता हे उपोषण उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. हजारो मराठा आंदोलक जरांगे यांच्यासोबत आझाद मैदानावर उपस्थित आहेत. आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे आता उद्या काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलिसांनी आजची परवानगी संपल्यानंतर, उद्यासाठी ही परवानगी वाढवली आहे. मात्र, आज दिवसभर आंदोलकांकडून वाहतूक कोंडीसह इतर नियमांचे उल्लंघन झाल्याने पोलिसांकडून काही अटी आणि नियम लागू केले जाण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाची परवानगी वाढवून मिळावी यासाठी मनोज जरांगे यांच्या वतीने आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यावर मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा करून एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याच्या आंदोलनात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि शांतता राखली जावी यासाठी काही कठोर नियम घातले जाण्याची शक्यता आहे.