मुंबई - मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात परिसरात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनासाठी हजारो मराठा आंदोलक मुंबईत आले आहे. त्यातच हायकोर्टाने हे आंदोलन बेकायदेशीर असून दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामे करा, मुंबई पुन्हा पूर्ववत करा असा आदेश दिले आहे. त्यानंतर पोलीस सक्रीय झाले आहेत.
आझाद मैदान परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहे. त्यात मराठा आंदोलकांना रस्त्यावरील वाहने हटवण्याची सूचना पोलिसांकडून करण्यात येत आहे. मराठा आंदोलकांची समजूत काढून न्यायालयाच्या आदेशाचा मान राखावा अशी सूचना पोलीस अधिकारी करत आहेत. यावेळी काही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. काही लोकांनी पोलिसांची वाट अडवली. सध्या आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती असल्याने पोलिसांनी याठिकाणी अतिरिक्त कुमक मागवली आहे.
आझाद मैदानात परिसरात दंगल विरोधी पथकही दाखल झाले आहे. पोलिसांकडून मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन आम्हालाही करावे लागेल, तुम्हालाही करावे लागणार आहे. मराठा आंदोलकांनी आतापर्यंत प्रत्येक सूचनांचे पालन केले. रस्त्यावरील वाहने हटवण्याचं काम मराठा आंदोलकांकडून सुरू आहे. त्याशिवाय रस्त्यावर पडलेला कचराही मराठा आंदोलकांनी उचलून साफसफाईचे काम केले आहे. मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरील आंदोलकांच्या सर्व गाड्या काढण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार पोलीस पुढची कार्यवाही करत आहेत.
मात्र ५ हजार आंदोलकांना आझाद मैदानात बसून द्यावे, आमच्या आंदोलकांसाठी लागणारे जेवण, साहित्य आणू द्यावे. आंदोलक शांततेने आंदोलन करत आहेत. आमची बाजू हायकोर्टासमोर आम्ही मांडू. रस्त्यावर कुठेही पार्किंग करायची नाही. वाहनांना ज्याठिकाणी पार्किगची व्यवस्था केली आहे तिथे वाहने घेऊन जावे. मुंबईकरांना त्रास देऊ नका, पोलिसांची हुज्जत घालू नका अशा सूचना मराठा समन्वयकांनी दिल्या आहेत. आझाद मैदान परिसरात पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरू आहे. या परिसरात मोठी गर्दी जमली आहे. सोबतच पोलिसांनी खबरदारी म्हणून रॅपिड एक्शन फोर्ससह अतिरिक्त कुमकही याठिकाणी मागवली आहे. तर संतप्त आंदोलकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली आहे.