Manoj Jarange Patil at Mumbai, Maratha Reservation: महाराष्ट्रात शुक्रवारी मराठा आंदोलनाचा वेगळा टप्पा सुरु झाला. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन आमरण उपोषणाला सुरुवात केली. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. मुंबईत जरांगे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरूण वर्गही कालपासून मुंबईत आला आहे. पण त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रशासनावर प्रचंड टीका केली जात आहे. तशातच, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. पालिका जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांना त्रास देत आहे. आमचीही वेळ येईल तेव्हा आम्ही तुमचे पाणी बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी मुंबईचे पालिका आयुक्त यांना दिला.
मला जरांगे पाटील म्हणाले, "मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाच्या आवारात असलेल्या मराठा आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी शांतता ठेवा. तुम्हाला जेवायला मिळू नये, पाणी मिळू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या पालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. आयुक्त साहेब, तुम्हीही सेवानिवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला सुट्टी मिळू देणार नाही. कधी ना कधी बदल होईलच. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. नंतर आमच्या गावात याल तेव्हा सगळा हिशोब केला जाईल", असा इशारा बीएमसी आयुक्तांना जरांगे यांनी दिला.
"मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार, आयुक्तांनी आमच्या मराठा आंदोलकांचे पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकाने बंद केली. बीएमसी आणि सीएसएमटीच्या परिसरात जमलेल्या आंदोलकांना विनंती आहे की, हे मुद्दाम केले जात आहे, पण तुम्ही संयम सोडू नका. तुमचे हाल होत आहेत, तर थोडे हाल होऊ द्या. मी पोलिसांना सांगतो की, पोरांना डिवचू नका. विनाकारण ताण देऊ नका. आपलीही वेळ येईल, तेव्हा गोष्टी आपल्याप्रमाणे घडवून आणू," असेही जरांगे म्हणाले.