मुंबई - मागील ३ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदान येथे आरक्षणासाठी उपोषण आंदोलन सुरू आहे. मात्र मराठा समाजातील लोकांची प्रचंड गर्दी या आंदोलनासाठी मुंबईत आल्याने दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर दिसून येत आहे. त्यातच काही जण गेट वे ऑफ इंडिया, काही जहांगीर आर्ट गॅलरी, काही सीएसएमटी स्टेशनवर गर्दी करत आहेत. त्याशिवाय मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारीही मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहेत.
रविवारी मरीन ड्राईव्ह परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी दिसून आली. मरीन ड्राईव्ह येथील नेकलेस परिसरात शेकडोंच्या संख्येने मराठा तरूण भ्रमंतीसाठी आले होते. मात्र काही मराठा तरूण खडकांवर जाऊन फोटो काढत होते. याठिकाणी असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना सूचना देत तिथून बाहेर येण्याची विनंती केली. या प्रकारामुळे मराठा आंदोलक स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना बाहेर येण्याची सूचना केली. त्याशिवाय मराठा आंदोलकांना जेवण मिळावे यासाठी याठिकाणीही टेम्पो फुटपाथवरून नेताना दिसून आला.
तर फक्त मरीन ड्राईव्ह नव्हे तर गेट ऑफ इंडियाचा समुद्र किनारा असेल, गेट ऑफ इंडिया असेल, ताज हॉटेल परिसरात मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमले आहे. यातील बहुतांश लोक गावखेड्यातून पहिल्यांदाच मुंबईला आले आहेत. त्यामुळे आंदोलनासोबत भ्रमंतीही करता येईल त्यामुळे ते आझाद मैदान सोडून इथेही फिरताना दिसतात. त्याशिवाय आंदोलनाबाबत घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणीही करत आहेत. दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळी मराठा आंदोलकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र समुद्राच्या एकदम जवळ जाऊ नये, स्वत:चा जीव धोक्यात घालू नये यासाठी पोलिसांनी या परिसरात गस्त वाढवलेली आहे.
उद्यापासून पाणीही सोडणार
दरम्यान, उद्यापासून पाणी बंद करणार आहे. सरकार मागण्यांच्या अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे उद्यापासून कडक आमरण उपोषण सुरू करणार आहे. मराठा समाजाच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल असं एकही पाऊल कुणी उचलायचे नाही. आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांतता राखायची. काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.