महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 06:57 IST2025-12-28T06:54:59+5:302025-12-28T06:57:09+5:30
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मनातील मुंबईसाठी काही मुद्दे मांडले. ‘लोकमत’च्या वरळी येथील कार्यालयात निवडक कलावंतांनी मुंबईशी निगडित मुद्द्यांवर केलेली ही चर्चा...

महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
महामुंबईतील धकाधकीच्या जीवनात थकल्या-भागल्या जिवाला मनोरंजनाचा बूस्टर डोस देत ताजेतवाने ठेवण्याचे काम कलाकार करीत असतात. नाट्य प्रयोग, शूटिंग, कार्यक्रम यासाठी पोहोचताना त्यांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. महामुंबईचे सुरेख चित्र त्यांच्या मनातही आहेच. संपूर्ण जगाच्या आकर्षणाचे केंद्र असलेली मुंबई आणखी देखणी व्हावी, अशी भावना त्यांच्याही मनात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या मनातील मुंबईसाठी काही मुद्दे मांडले. ‘लोकमत’च्या वरळी येथील कार्यालयात निवडक कलावंतांनी मुंबईशी निगडित मुद्द्यांवर केलेली ही चर्चा...
रोहिणी हट्टंगडी
(ज्येष्ठ अभिनेत्री. मराठी-हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमा, नाटक, मालिकांमध्ये काम. राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मान)
- महापालिका शाळेत कलेचा आठवड्यातून किमान एक तास व नागरिक शास्त्राचा एक तास, १०० गुणांसाठी नागरिक शास्त्राचा विषय असावा.
- सेवा-सुविधांवर येणारा ताण पाहता मुंबईतील लोकसंख्येला आळा घालणे गरजेचे आहे.
- विजेच्या खांबांवर वेगवेगळे राजकीय फलक कार्यक्रम झाल्यावरही अनेक दिवस तसेच असतात. यावर उपाय करायला हवा.
- कला, सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यांवर योग्य मार्ग निघू शकेल यासाठी महापालिकेत एखादा विशेष अधिकारी नेमायला हवा.
चंद्रकांत कुलकर्णी
(सर्जनशील दिग्दर्शक. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अनेक आशयघन नाटके आणली. राष्ट्रीय पुरस्काराने गौरव)
- महापालिकांनी आपल्या पडीक जागांपैकी कामाच्या जागा ‘आविष्कार’सारख्या संस्थांना उपलब्ध करून द्यायला हव्यात.
- कलाक्षेत्रातील कामांची मागणी कोणाकडे करायची ते कोणाला माहीत नाही. त्यासाठी ‘एक खिडकी’सोबतच कामात सुसूत्रता यायला हवी.
- नाटकांसाठी दिलेल्या तारखा राजकीय
कार्यक्रमासाठी रद्द करता कामा नयेत. रद्द केल्यास नाट्यसंस्थेला संपूर्ण खर्च दिला पाहिजे.
- कला क्षेत्रातील लोकांशी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी विचारविनिमय केला पाहिजे.
अशोक हांडे
(निर्माता, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, गायक, संगीतकार. २०१८ मध्ये ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ पुरस्काराने सन्मानित)
- मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृहांची संख्या खूप कमी आहे. दर एक लाख माणसांमागे एक थिएटर असायला पाहिजे.
- सांस्कृतिक खात्याला सरकार महत्त्व देत नाही. रंगकर्मींच्या मार्गदर्शनाखाली नाट्यगृहांमध्ये सकारात्मक बदल करायला हवेत.
- अधिकाऱ्यांच्या मर्जीवर चाललेला कारभार थांबवला पाहिजे. पुणे बालगंधर्वला नाटकाचे भाडे ५ हजार रुपये अन् मुंबईत २५ हजार असे का?
- शाळांसाठी राखीव असलेले भूखंड प्रायोगिक तत्त्वावरही कोणाला देऊ नयेत.
चिन्मयी सुमीत
(अभिनेत्री. मराठी शाळांच्या सदिच्छादूत. आजवर बऱ्याच नाटकांसोबत सिनेमांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारल्या.)
- शाळांतील वापरात नसलेल्या वर्ग खोल्या जागांची कमतरता असलेल्या अनेक नाट्यसंस्था, प्रायोगिक नाट्यसंस्था यांना वापरासाठी द्याव्यात.
- सांस्कृतिक कार्यशाळा किंवा कला शिक्षण अशा उपक्रमांसाठी अशा जागा वापरता येतील.
- मुंबईत सार्वजनिक उद्यानांची संख्या घटत आहे. मोकळ्या जागा विकसित करून सांस्कृतिक कट्टा, फिरती वाचनालये सुरू करता येतील.
- नाट्यगृह, थिएटर्स आहेत ती सुस्थितीत असावीत. वाहनतळ, स्वच्छतागृह अशा काही मूलभूत सोयी-सुविधा उत्तम असाव्यात.
शशांक केतकर
(अभिनेता. मालिकांमुळे घरोघरी लोकप्रिय. नाटक आणि सिनेमांमध्येही ठसा. सोशल मीडियावर सामाजिक मुद्द्यांवर वेळाेवेळी भूमिका.)
- मुंबईतील ‘वीकएंडस्’ बदलण्याची गरज आहे. मनोरंजन व शॉपिंग हे ऑनलाइन उपलब्ध आहे, त्यामुळे हा एक ‘प्रयोग’ करता येऊ शकतो.
- नाटकाला येणाऱ्या मुंबईकरांसाठी नाट्यगृहात स्वच्छता, वाहनतळ आणि त्या अनुषंगाने सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात.
- रस्ते रुंद, खड्डेमुक्त असावेत. सोसायटीतून बाहेर पडतानाचा मार्ग सुस्थितीत असावा.
- हॉस्पिटल, शाळा, मॉल, थिएटर, खासगी ऑफिस या सर्वच ठिकाणी लहानसहान सुविधा परिपूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे.