मांडवी, पायधुनी प्रभागात सर्वाधिक लोकसंख्या; ‘विरवाणी’, हनुमान टेकडी येथे सर्वात कमी लोकसंख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:51 IST2025-10-08T09:50:45+5:302025-10-08T09:51:10+5:30
BMC Election : प्रभागांची हद्द निश्चित करताना प्रत्येक प्रभागात लोकसंख्या समान ठेवण्याचा विचार करण्यात आला होता.

मांडवी, पायधुनी प्रभागात सर्वाधिक लोकसंख्या; ‘विरवाणी’, हनुमान टेकडी येथे सर्वात कमी लोकसंख्या
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महापालिकेची नवीन प्रभाग रचना सोमवारी जाहीर झाली असून, त्यानुसार कोणत्या प्रभागात किती लोकसंख्या आहे, हे समोर आले आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार एकीकडे प्रभाग क्रमांक २२४ मध्ये म्हणजेच सी वॉर्डातील पायधुनी, व्हिक्टोरिया डॉक्स, मांडवी, कोळीवाडा येथे सर्वाधिक ६४ हजार २४५ इतकी लोकसंख्या आहे. तर, दुसरीकडे प्रभाग क्रमांक ५१ मध्ये म्हणजेच विरवाणी इंडस्ट्रियल, हनुमान टेकडी, पहाडी स्कूल, जयप्रकाश नगर येथे सर्वात कमी म्हणजेच ४५ हजार ४६३ इतकी लोकसंख्या आहे.
प्रभागांची हद्द निश्चित करताना प्रत्येक प्रभागात लोकसंख्या समान ठेवण्याचा विचार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात प्रभागांची पुनर्रचना करताना लोकसंख्येत तफावत दिसून येत आहे. महापालिकेच्या नव्या आकडेवारीनुसार, काही वॉर्डांमध्ये ६० हजारांहून अधिक लोकसंख्या असून, काही ठिकाणी ती ४५ ते ४७ हजारांच्या दरम्यान आहे. आगामी निवडणुकीत या असमतोलाचा थेट परिणाम मतदारांच्या संख्येवर होण्याची शक्यता आहे.
मतदार यादी अद्याप निश्चित झालेली नाही
मतदारसंख्या निश्चित झालेली नसली, तरी लोकसंख्येच्या या आकडेवारीवरून काही वॉर्डांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त, तर काही ठिकाणी कमी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
सर्वाधिक व कमी लोकसंख्या असलेल्या वॉर्डांमध्ये कोणत्या जाती, धर्म आणि राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे, यावरही निकालाचे गणित अवलंबून राहील. प्रभागातील लोकसंख्येतील तफावतीमुळे स्थानिक घटक, व्यक्तिगत संपर्क आणि पक्षनिष्ठा या गोष्टी निर्णायक ठरू शकतात.
निवडणूक आयोगाने जाहीर करायच्या आरक्षण सोडतीनंतर आणि अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरच या लोकसंख्येच्या असमतोलाचा प्रत्यक्ष राजकीय परिणाम किती होतो, हे समोर येईल.
सर्वाधिक लोकसंख्या असलेले १० प्रभाग
प्रभाग क्रमांक लोकसंख्या
२२४ ६४,२४५
१६ ६३,२४१
२२३ ६३,०४५
१३२ ६२,९९२
२२६ ६२,९७८
२२५ ६२,३४१
१३१ ६१,८६२
१०४ ६१,७०९
१५ ६१,६८५
१५५ ६१,५३०
सर्वात कमी लोकसंख्या असलेले १० प्रभाग
प्रभाग क्रमांक लोकसंख्या
५१ ४५,४६३
५४ ४५,८४५
२६ ४६,०९९
१२१ ४६,१८६
२७ ४६,६६१
१३ ४६,७८४
५३ ४७,०३९
१२ ४७,३५२
२२ ४७,७२६
१८९ ४७,८१४