मुंबई - राज्य सरकारने अवजड मालवाहतूक वाहनांसाठी क्लीनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून, नागरिकांकडून २९ ऑगस्टपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. मात्र, ही सवलत फक्त ड्रायव्हर असिस्ट सिस्टम असलेल्या वाहनांसाठीच लागू राहणार आहे.
राज्यातील मालवाहतूक करणाऱ्या अनेक वाहनधारक संघटनांनी केलेल्या आंदोलनात चालकांसोबत सहायक (क्लीनर) देण्याची अट शिथिल करावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या मते सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वाहन निर्मिती होत असल्यामुळे सहायकाची (क्लीनर) शक्यतो गरज पडत नाही. त्यामुळे त्याचा विनाकारण खर्च वाढतो. तो खर्च कमी करण्यासाठी ही अट शिथिल करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. याबाबतच्या मसुद्यावरच्या सूचना, हरकती मिळल्यानंतर त्याचा अभ्यास करून शासनाकडून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
अवजड मालवाहतूक वाहनामध्ये सहायक असणे बंधनकारक राहणार नाही; परंतु ही सवलत केवळ ड्रायव्हर असिस्ट सिस्टम असलेल्या वाहनांसाठी लागू राहील. ड्रायव्हर असिस्ट सिस्टममध्ये ३६० अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे दृश्य देणारी सुविधा आवश्यक आहे.