कोट्यवधींचं पॅकेज तरीही तरुणाने मुंबई सोडली, ५ वर्ष गावातून काम केलं अन् आयु्ष्य असं बदललं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:27 IST2025-01-20T12:27:22+5:302025-01-20T12:27:50+5:30
एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या आणि कोट्यवधींचं पॅकेज असणाऱ्या तरुणाने मुंबईसोडून गावाकडचा रस्ता धरला आणि वेगळाच पायंडा घातला आहे.

कोट्यवधींचं पॅकेज तरीही तरुणाने मुंबई सोडली, ५ वर्ष गावातून काम केलं अन् आयु्ष्य असं बदललं!
गड्या मुंबईपेक्षा गाव बरा असं आपण अनेकदा ऐकतो. पण रिकामा खिसा काही गावात कुणाला टिकू देत नाही. चांगल्या कमाईसाठी, करिअरसाठी मुंबईत आल्याशिवाय काही पर्याय नाही हेही तितकंच खरं. पण एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या आणि कोट्यवधींचं पॅकेज असणाऱ्या तरुणाने मुंबईसोडून गावाकडचा रस्ता धरला आणि वेगळाच पायंडा घातला आहे. मुंबईला 'रामराम' करुन पाच वर्ष गावात राहून काम केल्यानंतरचा अनुभव सुमीत अग्रवाल नावाच्या तरुणानं त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर शेअर केला आहे.
मुंबई सोडण्याचा निर्णय आपल्यासाठी कसा फायदेशीर ठरला आणि त्यामागची पाच कारणं सुमीत याने सांगितली आहेत. सुमीत अग्रवाल हा मूळचा जमशेदपूर इथला पण करिअरसाठी मुंबईत आला. इथल्या बड्या कंपनीत उच्च पदावर नोकरीही करत होता. पण आपल्या लाइफस्टाइलमध्ये काही सुधारणा करण्यासाठी त्याने ५ वर्षांपूर्वी मुंबई सोडून आपल्य मूळ ठिकाणी म्हणजे जमशेदपूरला जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला.
"मुंबईसारखं सोशल लाइफ गावी मिळेल का?", "सुट्टीच्या दिवशी तिथे काय करणार?", "कामाच्या ठिकाणचं वातावरण कसं असेल?" असे अनेक प्रश्न मुंबई सोडताना पडले होते असं सुमीत सांगतो. पण आता गावात राहून पाच वर्ष झाली आणि आपला निर्णय कसा अचूक ठरला हे जाणवत असल्याचं सुमीतनं म्हटलं आहे.
मुंबईसोडून गावातून काम करण्यामागची ५ कारणं...
१. ट्राफिकची कटकट नाही
"मला माझ्या दिवसातील २०-२५ टक्के वेळ आता ट्रॅफिकमध्ये घालवावा लागत नाही. माझे ऑफिस १४ किमी अंतरावर आहे, जिथे पोहोचण्यासाठी मला फक्त १५ मिनिटे लागतात. तसंच ऑफिसमध्ये पोहोचल्यावर चिडचिड करत नाही हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे", असं सुमीतनं म्हटलं आहे.
२. राहणीमानाचा खर्च कमी:
मोठ्या शहरांच्या तुलनेत राहणीमानावर कमी खर्च करावा लागतो असंही सुमीत म्हटलं आहे. त्यामुळे मासिक खर्च लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा मोठा फायदा झाल्याचं सुमीत सांगतो.
३. कमी किमतीत सुविधा:
फूड डिलिव्हरीपासून ते ई-कॉमर्सपर्यंत, सुमीत शहरी जीवनातील सर्व सुविधांचा आनंद गावातही घेतो. गावात सर्व सुविधा सहज उपलब्ध आहेत. फूड डिलिव्हरी असो, ई-कॉमर्स असो, कॅब सर्व्हिस असतो किंवा मग मल्टिप्लेक्स असो. सगळं इथंही आहे.
४. सार्वजनिक जागांवर शांतता:
"मुंबईच्या तुलनेत गावी खूपच कमी गर्दी आहे. मुंबईत तर गर्दीची भीती बाळगून सुट्टीच्या दिवशी बाहेर जायला मला आवडत नव्हते. पण इथे तसं नाही.", असं सुमीतनं म्हटलं आहे.
५. आरोग्य आणि खेळांसाठी अधिक वेळ:
मुंबईतील धकाधकीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत गावातून काम करताना वेळेचे बचत होत असल्याने आरोग्यासाठी आणि खेळांसाठी अधिक वेळ देऊ शकतोय, असंही सुमीतनं म्हटलं आहे.
आपल्या निर्णयावर भाष्य करताना सुमीतने इतरांनाही एक प्रश्न विचारला आहे. तो म्हणतो, "पाच वर्षांपूर्वी, मला खरोखर खात्री नव्हती की एका लहान शहरातील जीवन कसं असेल. पण ते इतकं वाईट नाहीये. जर तुम्हाला पर्याय मिळाला तर तुम्ही टियर २ किंवा टियर ३ शहरात शिफ्ट होऊ शकता का?"