मुंबई: सहार विमानतळाला फोन करुन विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला इसम गोरेगावचा असून देश सोडून जात असलेल्या पत्नीला थांबवण्यासाठी विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. यामुळे विमान उड्डाणाला तब्बल पाच तास उशीर झाला. गोरेगावमध्ये राहणाऱ्या वसिम कुरेशीची (30) पत्नी तिच्या मायदेशी म्हणजेच फिलिपाईन्सला जात होती. याआधी दोघांमध्ये वाद झाला होता. वसिम आणि त्याची पत्नी यांची भेट दुबईत झाली होती. वसिम दुबईत एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा. मात्र त्याची नोकरी गेल्यानं दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. त्यामुळेच वसिमची पत्नी सिंगापूरमार्गे फिलिपाईन्सला जाण्यासाठी निघाली होती. तिला थांबवण्यासाठी वसिमनं विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती विमानतळ प्रशासनाला दिली. त्यामुळे विमानात ठेवण्यात आलेल्या सामानाची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली. यामुळे विमानाच्या उड्डाणात पाच तासांचा विलंब झाला. वसिम कुरेशीनं पहिला कॉल विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर यंत्रणेला केला होता, अशी माहिती सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 'हवाई गुप्तचर यंत्रणेला शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास वसिमचा कॉल आला. तर दुसरा कॉल विमानतळाच्या कॉल सेंटरला 9.30 च्या सुमारास करण्यात आला. पहिल्या कॉलमध्ये सिंगापूर एअरलाईन्समधून एक प्रवासी 500 ग्रॅम सोनं अवैधपणे नेत असल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यामुळे विमान थांबलं नाही. त्यामुळे वसिमनं दुसरा कॉल केला आणि विमानात बॉम्ब असल्याची खोटी माहिती दिली. यामुळे विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं आणि सामानाची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्यामुळे विमानाच्या उड्डाणास पाच तासांचा उशीर झाला,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
बायकोला थांबवण्यासाठी त्यानं चक्क विमान 5 तास रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 13:00 IST