ममता कक्ष सुरू केला, पण सुविधाच नाही! बाळाला दूध पाजताना गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 13:16 IST2023-03-19T13:14:37+5:302023-03-19T13:16:09+5:30
लहान बाळासह प्रवास करणाऱ्या मातांची गर्दीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानकावर मोठी गैरसोय होते. लहानग्यांचे डायपर बदलतानादेखील महिला वर्गाची अडचण होते

ममता कक्ष सुरू केला, पण सुविधाच नाही! बाळाला दूध पाजताना गैरसोय
मुंबई : बाळाला घेऊन रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना रेल्वेस्थानकात बाळाला स्तनपान करता यावे, यासाठी मध्य रेल्वेकडून आठ स्थानकांत ममता कक्ष उभा उभारण्यात आले आहेत; मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात ममता कक्षात वीज आणि पंखा सुरू नसल्याने स्तनदा मातांची गैरसोय होत आहे.
लहान बाळासह प्रवास करणाऱ्या मातांची गर्दीच्या ठिकाणी, रेल्वेस्थानकावर मोठी गैरसोय होते. लहानग्यांचे डायपर बदलतानादेखील महिला वर्गाची अडचण होते. रेल्वेस्थानकांतील स्वच्छतागृहांची अवस्था नेहमी बिकट असते. तेथील अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे त्या ठिकाणी थांबणे शक्य होत नाही. यामुळे महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत असते. स्तनदा मातांच्या तक्रारी आणि सूचना रेल्वेला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यासाठी ‘ममता कक्ष’ सुरू करण्यात आले आहे.
नॉन फेअर रेव्ह्युन्यू अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत सीएसएमटी स्थानकात ममता कक्ष उभारण्यात आला आहे; मात्र त्या ममता कक्षात पंखा आणि विजेची अडचण आहे तसेच ते सुरू करण्यासाठी असलेले स्विच हे ८ फूट उंचीवर आहे. त्यामुळे ममता कक्ष मदतीसाठी केला की दिखावा म्हणून केला, असा सवाल महिला प्रवासी विचारत आहेत. एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले की, स्तनदा मातांनी आम्हाला विचारणा केली असता ममता कक्ष खोलून देतो. मात्र ममता कक्ष दाखविण्यास सांगितले असता त्यामध्ये पंखा आणि वीज सुरु नव्हती. बाळाला दूध पाजताना आईची गैरसोय होत असल्याचे चित्र सध्या येथे दिसून आले.
कुठे आहेत ममता कक्ष?
सीएसएमटी
दादर
घाटकोपर
मुलुंड
ठाणे
चेंबूर
वाशी
खारघर
सीवूड
आम्हाला मुंबईहून अमरावतीला जायचे होते. सीएसएमटी स्थानकात ममता कक्ष असल्याबाबत कल्पना नाही. बाळाला भूक लागली होती म्हणून इथे आडोशाला बसून दूध पाजले.
- सुवर्णा इंगळे, प्रवासी
सीएसएमटी स्थानकातील ममता कक्षात वीज आणि पंख्याची सोय नाही. त्यामुळे अनेक महिला तिथे जाणे टाळतात.
- विजया केदारे, महिला प्रवासी