मालोजीराजे भोसलेंची समाधी धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:12 IST2018-05-23T01:12:00+5:302018-05-23T01:12:00+5:30
घाणीचे साम्राज्य : सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

मालोजीराजे भोसलेंची समाधी धूळ खात
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांची औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर समाधी आहे. मात्र या समाधीस्थळाजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ समाधीस्थळाच्या सुशोभीकरणासह कायमस्वरूपी नियोजनपूर्वक स्वच्छता करावी,अशी मागणी करणारे पत्र किसान आर्मी व वॉटर आर्मीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे़
महसूल विभागाने मोजणी करून नियमाप्रमाणे तारेचे कुंपण केल्यास कायमस्वरूपी स्वच्छता व सुशोभीकरणाची जबाबदारी घेण्याची तयारी संघटनेचे संस्थापक प्रमुख प्रफुल्ल कदम यांनी पत्रात दर्शवली आहे. कदम यांनी सांगितले की, स्वत: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शंभु महादेवाच्या या घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. या मंदिरासमोरच मालोजीराजेंची उत्कृष्ट समाधी बांधलेली आहे. मात्र सभोवताली असलेल्या घाण आणि अस्वच्छतेमुळे शिवभक्तांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. समाधीबाबत माहिती देणारा साधा फलकही याठिकाणी लावण्यात आलेला नाही. ही संतापजनक बाब असल्याचे कदम यांनी सांगितले.
मालोजीराजेंनी त्याकाळी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. मात्र त्याच मालोजीराजेंच्या समाधीची ही बिकट अवस्था राज्यासाठी लज्जास्पद बाब असल्याचे कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.