न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 05:50 IST2025-08-01T05:48:10+5:302025-08-01T05:50:09+5:30

‘आरोपींच्या सुटकेमुळे पीडितांवरील मानसिक आघाताची मला पूर्ण जाणीव आहे...’

malegaon case verdict justice lahoti said the outcome of the malegaon blast case is painful for the families of the victims | न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”

न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटासारख्या भीषण गुन्ह्यात कोणत्याही आरोपीला शिक्षा झाली नाही, ही गोष्ट संपूर्ण समाजासाठी, विशेषत: पीडितांच्या कुुटुंबीयांसाठी  वेदनादायी, हताश करणारी आणि मानसिक आघात करणारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे, असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. ए.के. लाहोटी यांनी सात आरोपींची सुटका करताना नोंदवले.

दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. कारण कोणताही धर्म हिंसेची शिकवण देत नाही. न्यायालय प्रचलित जनभावनांच्या आधारावर निकाल देत नाही. गुन्हा जितका गंभीर स्वरूपाचा असतो, तितका दोष सिद्ध करण्यासाठी पुराव्यांचा दर्जा अधिक ठोस आणि विश्वासार्ह असणे आवश्यक आहे, असे मत न्या. लाहोटी यांनी मांडले. 

या प्रकरणातील मुख्य आरोपीसह सात जणांची विशेष न्यायालयाने संशयाचा फायदा देत सुटका केली. निकाल देताना न्यायाधीश म्हणाले, ‘‘संशय हा खऱ्या पुराव्यांची जागा घेऊ शकत नाही. जर कोणताही ठोस पुरावा नसेल तर आरोपींना संशयाचा लाभ देणे योग्य ठरते. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून आरोपींना दोषी ठरवावे, असा विश्वास न्यायालयाला वाटला नाही. दोषसिद्धीसाठी आवश्यक पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे. 

‘अभिनव भारत’चा निधी घरासाठी 

आरोपींनी कट रचण्यासाठी नाशिक, भोपाळ आणि अन्य ठिकाणी बैठका घेतल्याचा आरोप आहे. मात्र, कोणत्याही साक्षीदाराने त्यास दुजोरा दिला नाही. त्यामुळे बैठका झाल्याचे आणि कट रचल्याचे सिद्ध झाले नाही. ‘अभिनव भारत’ या उजव्या विचारसरणीच्या संघटनेने दहशतवादी कृत्याकरिता निधी दिल्याचे पुरावे आहेत. परंतु, पुरोहितने ते पैसे घर बांधण्यासाठी वापरले, असे न्यायालयाने नमूद केले.   

कोर्ट म्हणाले, याचे पुरावेच नाहीत

आरडीएक्सचा स्त्रोत काय आणि त्याची कशी ने-आण करण्यात आली? याबाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. बॉम्बस्फोट करण्यासाठी घटनास्थळाची रेकी करण्यात आली होती, याचेही पुरावे नाहीत. मोटरसायकल कशी पार्क करण्यात आली, यासंदर्भातही काहीही सादर केलेले नाही.

 

Web Title: malegaon case verdict justice lahoti said the outcome of the malegaon blast case is painful for the families of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.