Join us
Daily Top 2Weekly Top 5

"म्हणून ओमकार सणकला अन्..."; मालाड रेल्वे हत्येप्रकरणी माजी आमदाराचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 11:40 IST

प्राध्यापक आलोककुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर आरोपी ओमकारला पोलिसांनी अटक केली.

Mumbai Crime: मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासात गेल्या आठवड्यात एका तरुण प्राध्यापकाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली. विलेपार्ले येथील प्रसिद्ध एन.एम. महाविद्यालयातील प्राध्यापक आलोककुमार सिंह (३१) यांची चालत्या ट्रेनमध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी ओमकार शिंदे याला अटक केली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दुसरीकडे विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी आरोपी ओमकार शिंदेबाबत धक्कादायक दावा केला आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी घेण्यासाठी ओमकारने हे कृत्य केल्याचे कपिल पाटील यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं.

२४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. आलोककुमार यांच्या पत्नीचा त्यादिवशी वाढदिवस होता. आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते महाविद्यालयातून लवकर निघाले होते. मात्र, मालाड स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. वादानंतर मालाड स्थानकात उतरत असताना ओमकारने आपल्या जवळील धारदार चिमटा आलोक यांच्या पोटात जोरात खुपसला. हा वार इतका खोलवर होता की शरीरातून प्रचंड रक्तस्राव सुरू झाला.

शस्त्र खुपसल्यानंतर आरोपी ओमकार मागे न वळता गर्दीचा फायदा घेऊन पसार झाला. गंभीर जखमी झालेले आलोककुमार विव्हळत ट्रेनमधून खाली उतरले आणि प्लॅटफॉर्मवरील बाकावर जाऊन बसले. आजूबाजूला मोठी वर्दळ होती, पण कोणालाही काय घडले हे कळले नाही. काही प्रवाशांनी आरोपीचा पाठलाग केला, पण तो निसटला होता. रुग्णालयात नेण्यापूर्वीच अतिरक्तस्रावामुळे आलोककुमार यांची प्राणज्योत मालवली. रेल्वे पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी ओमकार शिंदेला बेड्या ठोकल्या आहेत. 

अपमानाचा बदला घेण्यासाठी केली हत्या

विधानपरिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी सोशल मिडिया पोस्टमध्ये या प्रकरणावर भाष्य केलं.

"ट्रेनमध्ये धक्के कधी लागत नव्हते ? पण आता धक्काही सहन होत नाही. लोकांचे पेशन्स संपत चालले आहेत. किरकोळ कारणांवरून माणसं घायकुतीला येतात. २७ वर्षांच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने ३२ वर्षांच्या प्रा. आलोक कुमार सिंह यांचा बळी घेतला. प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये तो गणित शिकवायचा. दोन वर्षांपूर्वी तो लेक्चरर म्हणून लागला होता. त्याचे प्राचार्य पराग आजगावकर सांगत होते, कोणत्याच भानगडीत न पडणारा, अत्यंत सालस पण तितकाच बुद्धिमान शिक्षक. ट्रेनमधून अनेकदा दारात लटकून सगळेच प्रवास करतात. मीही केलाय लटकत. लटकणार्‍यांना लोक हाताने आधार द्यायचे. पोलिसांनी अवघ्या १२ तासात मारणार्‍याला शोधून काढलं. पोलिसांचं कौतुकच. ओमकार शिंदे असं का वागला ? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती त्याची, तरीही जीवघेण्याचा गुन्हा त्याच्याकडून का घडला? पोलीस शोधताहेत. मालाडच्या घटनेला रंग देण्याची गरज नाही. पण माणसं घायकुतीला येतात. पेशन्स हरवतात. राग अनावर होतो. धारदार शस्त्राने थेट पोटात वार होतो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो. लोकही मध्ये पडत नाहीत. मारणार्‍याचे हात धरत नाहीत. माणसं प्रचंड भयाखाली जगताहेत. संशयाने पाहताहेत. एका बाजूला लोकलचा ताण, प्रचंड धावपळ, सुधारणांची शक्यता नाही. चिकटून एकमेकांचा घाम एकमेकात रिचवून प्रवास करणार्‍यांची मनं मात्र आता एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत, अशी भावना कपिल पाटील यांनी व्यक्त केली.

कशामुळे हे घडतंय?

"अशांततेचे सोपे फंडे शोधतात आमचे नेते. त्यांच्या राजकारणासाठी. पण अप्रत्यक्षपणे ते लोकमनावर खोल परिणाम करत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरा- दारातले आणि प्रवासातले ताण - तणाव, संशय आणि द्वेष एकाबाजूला. तर दुसऱ्या बाजूला जगण्याची साधनं, उत्पन्न अत्यंत मर्यादित. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या माणसांचा स्फोट होतो. गेले काही महीने भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाने कंठाळी गदारोळ सुरू आहे. मी मराठी तो भैय्या, मी हिंदू तो मुसलमान. आपली सहनशिलता आणि सहिष्णुता पार हरवून गेली आहे. मनात साचलेल्या रागाला आपल्याच सारख्या दुसर्‍या कष्टकरी माणसाला शत्रू बनवलं आहे. मारणारा ओमकार दिवसभर कष्ट करून किती कमवत असेल ? १५-१६ हजार. पण आलोक सिंहचा पगार तरी किती होता ? तोही ज्युनिअर कॉलेजला कंत्राटी शिक्षक. जेमतेम २० हजार. ओमकार १२वी पास होता, कोकणी मुलगा. पण ओमकारला राग व्यवस्थेचा येत नाही, आलोकचा येतो," असं कपिल पाटील म्हणाले.

कुणीतरी त्याला तसं सांगितलेलं असतं 

"आपल्या घरातलं कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतं, त्याची काळजी आपणच व्हायला हवी. सहनशिलता आणि सहिष्णुता त्याला शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो. व्यवस्थेवर मात्र कधीच होत नाही. आपला मुलगा कोणावर तरी राग काढतो. त्याच्या हातून काही अघटीत घडतं. मग आपला मुलगाही वाचत नाही. नेत्यांच्या मुलांवर साधी केसही होत नाही. आलोक सिंहच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत होतो. त्याच्या वडिलांचा आणि गर्भार पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडत होता. त्याच्या गर्भार पत्नीचं काय होईल? महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओमकार सणकला. पुरुषी मानसिकता आणि दुसऱ्याचा द्वेष या दोघांचं कॉकटेल विषारी बनतं. आत्मघातकी बनतं. त्यातून टोकाची प्रतिक्रिया उमटते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओमकार सारख्या तरुणाकडून गुन्हा घडतो, हे अधिक गंभीर आहे. आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आणि ओमकार आपल्या घरातलाच, असं कपिल पाटील यांनी म्हटलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Malad Railway Murder: Ex-MLA Reveals Shocking Details; Omkar Snapped Due to Humiliation.

Web Summary : Professor Alok Kumar Singh was murdered on a train at Malad station. Omkar Shinde was arrested. Ex-MLA Kapil Patil claims Omkar killed due to humiliation. Patil highlights societal stress, intolerance, and economic struggles as potential contributing factors.
टॅग्स :गुन्हेगारीलोकलमुंबई पोलीस