Join us

पत्नीने तीन महिन्यांच्या प्रेमासाठी पतीला संपवलं; हत्या करुन बाईकवरुन लावली मृतदेहाची विल्हेवाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 21:54 IST

मालाडमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची घरात निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime: मुंबईच्या मालाड भागातून हादरवणारी बातमी समोर आली आहे. मालाडमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासह मिळून पतीची मुलांसमोरच हत्या केली. दोघांनी आधी पतीला दारू पाजली आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याचा जीव घेतला. आरोपींनी हत्येनंतर पतीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन निर्जनस्थळी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन पती हरवल्याची खोटी तक्रार दाखल केली होती. मात्र पोलीस तपासात पत्नीने आणि तिच्या प्रियकरानेच मिळून ही हत्या केल्याचे उघड झालं.

मालाड पश्चिम येथील मालवणीत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. शनिवारी रात्री उशिरा मृत राजेश चौहानची पत्नी पूजा आणि तिचा मित्र इम्रान मन्सूरी यांनी मालवणी पोलीस ठाणे गाठले. पूजाने राजेश बेपत्ता झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आणि त्याचा फोटोही दिला. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. मात्र एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पत्नी पूजा आणि इम्रान बाईकवरून जाताना दिसले. त्यामुळे पोलिसांना दोघांवर संशय आला.

त्यानंतर पोलिसांनी पूजा आणि इम्रानला ताब्यात घेतलं. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. दोघांनी मिळून हा खून घरातच केला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो निर्जनस्थळी फेकला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पूजाच्या घरातून रक्ताने माखलेला चाकू आणि कपडेही सापडले आहेत.

मृत राजेश हा मालवणी येथे पत्नी पूजा, १० वर्षांची मुलगी आणि आठ वर्षाच्या मुलासह भाड्याने राहत होता. तीन महिन्यांपूर्वी त्याचा मित्र इम्रान मन्सूरी मुंबईत आला आणि त्यांच्यासोबत राहू लागला. यावेळी पूजा आणि इम्रानमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी राजेशच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री, पूजा आणि इम्रानने राजेशला मारण्याचे ठरवलं होतं. त्यांनी आधी राजेशला भरपूर दारू पाजली आणि नंतर मुलांसमोर चाकूने त्याचा गळा चिरला, 

राजेशच्या हत्येनंतर घरात रक्त पसरले होते. त्यानंतर आरोपींने ते चादरीने साफ केले. दोघांच्या शरीरावरही रक्ताचे डाग होते, म्हणून त्यांनी कपडे बदलले. घर पुन्हा स्वच्छ केले आणि नंतर मृतदेह दुचाकीवरून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी फेकून दिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जात त्यांनी तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस