म्हातारीचा बूट चकाकणार, नव्या ट्रॅकमध्ये करा जॉगिंग; विविध उद्यानांचा महापालिका करणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2023 12:47 IST2023-06-03T12:47:01+5:302023-06-03T12:47:19+5:30
मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट आता चकाकणार आहे.

म्हातारीचा बूट चकाकणार, नव्या ट्रॅकमध्ये करा जॉगिंग; विविध उद्यानांचा महापालिका करणार कायापालट
मुंबई : दक्षिण मुंबईत विविध उद्यानांमध्ये दर शनिवार आणि रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बच्चेकंपनीसाठी हँगिंग गार्डन तर हक्काचे ठिकाण. या उद्यानांचा आता महापालिका कायापालट करणार आहे. मलबार हिलच्या कमला नेहरू पार्कमधील म्हातारीचा बूट आता चकाकणार आहे. तर फिरोजशहा मेहता उद्यानातही अनेक विकासकामे करण्यात येणार आहे. ही उद्याने आणखी कशी आकर्षक करता येतील यावर भर देण्यात येणार आहे. येथील वृक्षसंपदा जोपासण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नव्याने जॉगिंग ट्रॅकही उभारण्यात येणार आहे.
फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क हे मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांमध्ये गणले जात असून महापालिकेकडून यांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत सर फिरोजशाह मेहता उद्यानमधील जॉगिंग ट्रॅकवर लवकरच विटांचा खच टाकून ट्रॅक नव्याने तयार करण्यात येणार आहे. या नव्या कामामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही तसेच चालताना पायांना आरामदायी वाटेल तसेच या नवीन कामामुळे जॉगिंग ट्रॅक भुसभुशीत होणार आहे.
३५,००० चौरस मीटरवर पसरलेली उद्याने
हिरवळ, शोभेची झाडे, फुलझाडे, गॅझेबो, सेल्फी पॉइंट आदी उद्यानांच्या सौंदर्यात भर घालतात. तसेच दोन्ही बागांचे क्षेत्रफळ अंदाजे ३५,००० चौरस मीटर आहे. याशिवाय उद्यानात पाथवे,खेळाची उपकरणे, इको पॉईंट, फिश पॉन्ड, लोटस पॉन्ड, समर हाऊस, पृथ्वी कारंजे, गॅझेबो आदी सुविधा आहेत. तसेच जवळपास १५००० चौरस मीटर जागा रँक वनस्पतींनी व्यापलेली क्षेत्र आहे. म्हातारीच्या बुटासह कमला नेहरू पार्कमध्ये दहा फूट उंचीचा शंख उभारण्यात आला आहे.
फुले, फळझाडांचे आयुष्य वाढणार
सर फिरोजशहा मेहता उद्यानमधील हिरवळवर आणि झाडांभोवती लाल माती टाकण्यात येणार आहे. तसेच येथील फूल आणि फळझाडांनाही शेणखत टाकण्यात येणार आहे. लाल माती टाकल्याने झाडे हिरवीगार राहणार आहेत. शेणखतामुळे या झाडांचे आयुष्यही वाढणार असून, झाडे सदा बहरलेली राहणार आहेत तसेच शेणखत आणि लालमातीमुळे येत्या पावसाळ्यात बागकामालाही वेग येणार आहे.